scorecardresearch

हळदीची यंदा दोन लाख टन निर्यात ; नव्या विक्रमाच्या दिशेने; जगभरातून मागणीत वाढ 

औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.

हळदीची यंदा दोन लाख टन निर्यात ; नव्या विक्रमाच्या दिशेने; जगभरातून मागणीत वाढ 
(संग्रहित छायाचित्र)

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे :  भारतातून गेल्या तीन वर्षांपासून हळदीच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. करोना काळात हळदीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग अनेक राष्ट्रांमध्ये नव्याने होऊ लागला. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.

२०२०-२१ मध्ये देशातून १ लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात झाली होती. २१-२२मध्ये जुलैअखेर १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली आहे. वर्षअखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य आहे, असा अंदाज कसबे-डिग्रज (सांगली) येथील हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. जगभरात होत असलेला आयुर्वेदाचा प्रसार आणि करोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. २०१८-१९ मध्ये १ लाख ३३ हजार ६०० टन इतकी हळद निर्यात झाली होती. सन २०१९-२० हळदीची निर्यात ४०५० टनांनी वाढून १ लाख ३७ हजार ६५० टनापर्यंत पोहोचली होती. २०२० मध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. हळूहळू प्रादुर्भाव वाढू लागला. परिणामी निर्यात काही प्रमाणात बंद होती, त्यामुळे निर्यात घटेल असा अंदाज होता. मात्र, याच काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात हळदीचा वापर वाढला आहे. सन २०२०-२१ मध्ये हळदीची १ लाख ८३ हजार ८६८ टन निर्यात झाली. अर्थात ४६ हजार २१८ टनाने वाढली.

जगभरातून देशातील हळदीला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून हळदीची निर्यात सतत वाढत आहे. सध्या देशातून १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली असून, ही निर्यात दोन लाख टनांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे.

डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र कसबे-डिग्रज, जि. सांगली.

औषध म्हणून..

करोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढत चालला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो  हळद गरम पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो.

थोडी माहिती.. जगात भारत हळद उत्पादनात अव्वल आहे.  हळदीचे एकूण ८० टक्के उत्पादन भारतातच होते. आंध्रप्रदेश, ओदिशा आणि तामीळनाडूमध्ये सर्वाधिक हळद होते. इथल्या हळदीचा दर्जा चांगला असतो. त्यामुळे अमेरिका, इंग्लडसह अरब देशांतून हळदीला चांगली मागणी आहे.

गेल्या चार वर्षांत..

वर्ष           निर्यात       उलाढाल

                  (टनांत)         (लाखांत) 

२०१८-१९       १,३३,६००       १४१,६१६

२०१९-२०       १,३७,६५०       १२८,६९०

२०२०-२१       १,८३,८६८       १७२,२६४

२०२१-२२       १,५३,१५४       १७८,४३३     

(आकडेवारी स्रोत स्पाइसेस बोर्ड)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India export two lakh tonnes of turmeric this year zws

ताज्या बातम्या