पुणे : पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) त्रिमितीय मुद्रित (थ्रीडी प्रिंटेड) स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे. अशा केंद्रांद्वारे स्थानिक पातळीवरील पाऊस, तापमान, उष्णतेच्या लाटा, प्रदूषणाबाबत अचूक माहितीच्या नोंदी शक्य होतील. अतिशय कमी खर्चात यंत्रणा तयार होत असल्याने महानगरांपासून दुर्गम भागांत अशी केंद्रे उभारून अनेक ठिकाणच्या स्थानिक पातळीवरील नोंदी घेणे शक्य होईल.
केंद्र सरकारतर्फे ‘मिशन मौसम’ ही योजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत देशातील हवामान निरीक्षणांसाठीच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे, हवामान अंदाज प्रणाली अचूक करणे आणि हवामान बदलांबाबतची माहिती उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ‘आयआयटीएम’ने त्रिमितीय मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे. ते जागतिक हवामान संघटनेच्या मानकांनुसार प्रमाणितही आहे.
‘सन २०१६ मध्ये ऑस्ट्रियातील युरोपीयन जिओसायन्स युनियनच्या परिषदेत युनिव्हर्सिटी कॉर्पोरेशन फॉर ॲटमोस्फेरिक रिसर्च (यूसीएआर) येथील शास्त्रज्ञांसह झालेल्या चर्चेत कमी खर्चातील त्रिमितीय मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्राची कल्पना पुढे आली. त्या वेळी ‘यूसीएआर’चे शास्त्रज्ञ आफ्रिकेतील यूएसएड प्रकल्पांसाठी कमी खर्चिक हवामान केंद्र विकसित करत होते. त्यानंतर २०१९नंतर दिल्लीत ‘अर्बन टेस्टबेड्स आणि मेसोनेटवर्क’ प्रकल्प सुरू झाला. त्या वेळी महानगरांमध्ये तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्यांचा वेग व दिशा, पर्जन्यमान, उष्णतेचा ताण अशा घटकांच्या उच्च दर्जाच्या निरीक्षणांसाठी व्यापक जाळे उभारण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यातून त्रिमितीय मुद्रित स्वयंचिलत हवामान केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात आली. त्यासाठी ‘यूसीएआर’च्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले,’ अशी माहिती ‘आयआयटीएम’च्या शास्त्रज्ञ डॉ. तारा प्रभाकरन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
त्या म्हणाल्या, ‘सुटे भाग सहजपणे जोडता येतील, अशा प्रकारची या उपकरणाची रचना आहे. त्यामुळे उपकरण बंद राहण्याचा कालावधी कमी होतो. वर्षभराच्या चाचणी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेत संभाव्य तांत्रिक अडचणी समजून घेऊन उपाययोजना विकसित करण्यात आल्या आहेत. भविष्यात व्यापक अंमलबजावणीच्या दृष्टीने इनक्युबेशन केंद्र उभारण्याचा विचार आहे.’
‘संपूर्ण यंत्रणा सौर ऊर्जेवर चालते. संकलित केलेला विदा मोबाइल नेटवर्कद्वारे पाठवला जातो. त्यामुळे ही प्रणाली दुर्गम भागात वापरण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. प्रणालीसाठी वापरलेले साहित्य उच्च तापमान सहन करू शकते, उपकरण कार्यक्षम राहील याची चाचणी करण्यात आली आहे. मात्र, उपकरणाचा टिकाऊपणा ते ज्या ठिकाणी बसवले आहे, त्यावर अवलंबून आहे,’ असे डॉ. तारा यांनी सांगितले.
अमेरिका, आफ्रिकेसह काही देशांत अशी प्रणाली वापरली जाते. या तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करून व्यापक हवामान निरीक्षणांसाठी विकसित करण्यात आले आहे. योग्य स्थळ, मूलभूत पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था उपलब्ध झाल्यास स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे प्रत्येक परिसरातून हवामान नोंदी घेण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणता येऊ शकते. त्यामुळे किफायतशीर खर्चात हवामान आणि पर्यावरणीय माहितीचे संकलन, विश्लेषण करता येऊ शकते, असे डॉ. तारा यांनी नमूद केले.
केंद्र कसे चालते?
- तापमान, आर्द्रता, वारा, पर्जन्यमान अशा विविध हवामान घटकांच्या अचूक मोजणीसाठी या प्रणालीवर संवेदक (सेन्सर्स) आहेत.
- अतिरिक्त संवेदक जोडल्यास हवा गुणवत्ता, धूलिकण, उष्णता अशा अन्य पर्यावरणीय घटकांच्या नोंदी घेणे शक्य.
- निरीक्षणांचा टप्प्याटप्प्याने विस्तार करणे शक्य.
- त्रिमितीय मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्राची ‘आयआयटीएम’मध्ये निर्मिती सुविधा.
- सुविधेचा खर्च : सुमारे ५ लाख रुपये
- सध्या दोन दिवसांत एक हवामान केंद्र तयार करण्याची क्षमता.
- अतिरिक्त थ्रीडी प्रिंटर जोडल्यास उत्पादनामध्ये वाढ शक्य.
- एका केंद्रासाठी खर्च : सुमारे ५० हजार रुपये.
- प्रणालीसाठी आवश्यक जागा : दोन ते तीन मीटर लांब-रुंद.
