पुणे : देशातील पहिले अत्याधुनिक एर्गोनॉमिक्स अँड ह्युमन फॅक्टर रिसर्च सेंटर (एईएचएफआरसी) पुण्यात स्थापन केले जाणार आहे. यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची भौतिक वैशिष्ट्ये आणि गरजांनुसार अभियांत्रिकी तंत्रज्ञान विकसित केले जाणार असून, यासाठी १०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
एआरएआय आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने केंद्राच्या स्थापनेसाठीच्या इरादापत्रावर स्वाक्षरी केली आहे. या प्रसंगी एआरएआयचे संचालक रेजी मथाई, वरिष्ठ उपसंचालक मेधा जांभळे, विजय पंखावाला, राहुल महाजन, उपसंचालक महेश पटवर्धन आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे, विशेषाधिकारी डॉ. अविनाश जोशी आणि संचालक डॉ. एस. पी. महाजन आदी उपस्थित होते. या केंद्राची स्थापना सीओईपीच्या चिखलीतील संशोधन व नावीन्यता केंद्रात केली जाणार आहे.
हे केंद्र सुमारे ३८ हजार चौरस फूट जागेवर विस्तारलेले असेल. या केंद्राच्या माध्यमातून युरोपमधील एर्गोनॉमिक्स म्हणजेच कार्यानुरूपण तंत्रज्ञान आणि क्षमतांवरील अवलंबित्व कमी केले जाणार आहे. याच वेळी आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून स्वदेशी संशोधन आणि विकासावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीयांच्या शरीराच्या ठेवणीचे मूल्यमापन, आरामदायी आसनव्यवस्थेचे विश्लेषण, मानवी जीवयांत्रिकीचा अभ्यास आणि दृश्य क्षेत्राचे मूल्यमापन या बाबी पहिल्या दोन ते तीन वर्षांत पूर्ण केल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढील चार ते पाच वर्षांत पूर्ण क्षमतेने हे केंद्र विकसित करण्यात येईल.
नेमका फायदा काय?
राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून हे केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यात एर्गोनॉमिक्सचे संशोधन, चाचणी, प्रमाणीकरण, प्रशिक्षण, नावीन्यता आणि उद्योगांचा सहभाग यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सुविधेमुळे वाहननिर्मिती, संरक्षण, विमाननिर्मिती, रेल्वे, कृषी, औद्योगिक उपकरणे, ग्राहकोपयोगी वस्तू, फर्निचर, बांधकाम उपकरणे आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांना फायदा होईल. या केंद्रातून होणाऱ्या संशोधनातून भारतीय व्यक्तींच्या शारीरिक रचनेला अनुरूप अशा उत्पादनांची निर्मिती शक्य होणार आहे. तसेच, हे केंद्र प्रशिक्षण कार्यक्रमांतून कुशल मनुष्यबळ निर्माण करणार आहे.
अधिकाधिक मानवकेंद्री तंत्रज्ञान
तंत्रज्ञान हे अधिकाधिक मानवकेंद्री बनू लागले असून, त्यात मानवी घटक महत्त्वाचे ठरत आहेत. एखादा उत्पादनाची सुरक्षा, स्थिरतेबरोबरच ते वापरणाऱ्यासाठी अनुरूप असणे हे कळीचे ठरत आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी भागीदारी करून एआरएआयने एर्गोनॉमिक्समधील अत्याधुनिक संशोधनासाठी देशव्यापी परिसंस्था निर्माण करण्याचे पाऊल उचलले आहे. यातून स्वदेशी क्षमता विकसित होणार असून, त्यांचा उद्योगांना फायदा होईल, असे ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी सांगितले.
