करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या बीक्यू.१ या उत्परिवर्तित प्रकाराचा भारतातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला. बीक्यू.१ हा प्रकार ओमायक्रॉनच्या बीए.५ या उपप्रकाराचेच थोडे वेगळे रूप असून, सध्या अमेरिकेमध्ये बीक्यू.१चे संसर्गबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

हेही वाचा >>>भाज्या आणखी महाग ; परतीच्या पावसाने पिके पाण्यात; आवक घटली

राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) शास्त्रज्ञांनी केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणातून ही माहिती पुढे आली. चीनमधील बीएफ.७ या उत्परिवर्तित उपप्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण गुजरातमध्ये आढळल्यानंतर आता बीक्यू.१ या प्रकाराचा विषाणूबाधित रुग्ण पुण्यात आढळला. उत्परिवर्तनामुळे हा विषाणू उपप्रकार अधिक संसर्गकारक व रोगप्रतिकारशक्ती भेदणारा आहे. देशात बीए.५ आणि त्याच्या उपप्रकाराने बाधित रुग्णांचे प्रमाण हे एकूण करोना संसर्गाच्या प्रमाणात पाच टक्क्यांहून कमी आहे. तर बीए.२ या ओमायक्रॉनच्या आणखी एका उपप्रकाराचा संसर्गबाधित रुग्ण एकूण करोना संसर्गाच्या सुमारे ८० टक्क्यांहून अधिक आहेत. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका आदी देशांत बीक्यू.१ या उपप्रकाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.अमेरिकेच्या रोगनियंत्रण केंद्राच्या (सीडीसी) माहितीनुसार बीक्यू.१ आणि बीक्यू.१.१ या उपप्रकाराच्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ११ टक्के आहे. साधारणपणे महिन्याभरापूर्वी या उपप्रकारांचे संसर्गबाधित रुग्ण अवघे एक टक्का होते.

हेही वाचा >>>पुण्यात पावसाचा धुमाकूळ ; ११ किलोमीटर उंचीचे ढग; अकरा वर्षांतील विक्रमी पाऊस

एनआयव्हीतील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, नव्याने आढळलेले उपप्रकार हे ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन आहे. जानेवारीत ओमायक्रॉन आढळल्यानंतर संपूर्ण नवा उपप्रकार अद्याप निदर्शनास आलेला नाही. मात्र नव्याने आढळलेल्या उत्परिवर्तित उपप्रकारांतही रुग्णसंख्या वाढवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ओमायक्रॉनच्या बीए.२ या उपप्रकारापासून उत्परिवर्तित बीए.२.७५ या विषाणू प्रकाराचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. विषाणूतील उत्परिवर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी सांडपाण्याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.