पुणे : केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राने (सीडब्ल्यूपीआरएस) हवामानातील बदल, पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वकल्पना अल्पावधीत आणि अचूकपणे प्राप्त करण्यासाठी अत्याधुनिक राष्ट्रीय हायड्राॅलिक प्रकल्पांतर्गत (एनएचपी) सेन्सर आधारित टेस्टिंग, कॅलिब्रेशन आणि सर्टिफिकेशन सुविधा (टीसीसीएफ) असलेल्या प्रयोगशाळा उभारल्या आहेेत. यामुळे हायड्रॉलिक यंत्रसामग्री चाचणी क्षेत्राला चालना आणि राष्ट्रीय जलसंसाधनांची सुरक्षितता आणखी मजबूत होणार आहे.
या प्रयोगशाळेत हवामान संवेदक, ‘करंट मीटर’, इन्ग्रेस’ सुरक्षा, भूजल पातळी, पाण्याची गुणवत्ता, विदा संकलनाच्या माध्यमातून संशोधन, जल पातळी पृष्ठभाग संवेदक यांचा समावेश असून, देशभरातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील जलसुविधांचे अचूक मूल्यमापन करता येणे शक्य होणार असल्याने, राष्ट्रीय पातळीवरील धोरणांची अंमलबजावणी आणखी बळकट करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान कॅलिब्रेशन सुविधा असलेली ही देशातील पहिली ‘आयएसओ’ मानक प्रयोगशाळा आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून भारत स्वयंपूर्ण संशोधन करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सिद्ध होत असल्याचे, सीडब्ल्यूपीआरएसच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने देशातील, राज्यातील प्रत्येक ठिकाणावरील बदलत्या वातावरणाची माहिती अचूकपणे संकलित करून त्याचे मूल्यमापन करण्यात येते. एकाचवेळी ४५ सेन्सर कॅलिब्रेशन असल्याने हवामानातील आर्द्रता अचूक दर्शवणे शक्य होणार आहे.
जलसंसाधनातील यांत्रिक समस्या किंवा त्यांची अचूक कार्यमापनता निश्चित करण्यासाठी ‘इन्ग्रेस प्रोटेक्शन’ चाचणी प्रयोगशाळा, पाण्याचा प्रवाह आणि वेगाचे मोजमाप आणि अचूक माहितीसाठी ‘करंट मीटर कॅलिब्रेशन’, पाणी आणि धूळ यांच्या संरक्षणासाठी विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि ‘हायड्रो-मेटिओरॉलॉजिकल’, भूजल पातळीचे अचूक मापन करण्यासाठी ‘सेन्सर’ चाचणी, पाण्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी ‘कॅलिब्रेशन’, पृष्ठभागावरील पाणी पातळी आणि भूजल पातळीच्या माहितीची अचूकता साध्य करण्यासाठी ‘डेटा लाॅगर’, कमी कालावधीत अचूक माहिती आणि इशारे प्राप्त होण्यासाठी ‘टेलिमेट्री’, हायड्रॉलिक प्रणालींचे मूल्यांकन आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी ‘हायड्राॅलिक कॅव्हिटेशन’, पाणी पातळी मोजमाप, पूर अंदाज आणि धरण व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पृष्ठजल पातळी सेन्सर प्रात्यक्षिक अशा निरनिराळ्या प्रयोगशाळांच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करण्यात येणार आहे.
‘सीडब्ल्यूपीआरएस’मधील या निरनिराळ्या प्रयोगशाळांमध्ये जलसंपदा, संसाधनांमध्ये विश्वासार्हता निर्माण करून, नैसर्गिक आपत्तीचे पूर्वनियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे. कमीत कमी वेळेत अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी मापदंड निश्चित करून जागतिक विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या संशोधनाची निर्मिती करून बलशाली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. – डॉ. प्रभात चंद्रा, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस
