पुणे : सध्याचे हरितगृह वायूंचे उत्सर्जन प्रमाण असेच राहिले, तर भारतातील वने या शतकाअखेरपर्यंत आतापेक्षा दुप्पट कार्बन साठवणूक करतील, असे एका अभ्यासातून नुकतेच स्पष्ट झाले. मात्र, वनांनी अधिक कार्बन शोषला म्हणजे हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी होतील, असा याचा सरळसोट अर्थ नसल्याचा इशारा या अभ्यासात सहभागी संशोधकांनी दिला. पाऊसमानानुसार भविष्यातील वनांचे नियोजन अधिक स्थानिक, हवामानसजग आणि जोखीम प्रतिबंधक करणे अपेक्षित असून, ते या अभ्यासाद्वारे शक्य होईल.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), बिट्स पिलानी, केरळ कृषी विद्यापीठ, स्वीडन येथील लुंड विद्यापीठ यांनी याबाबतचे संयुक्त संशोधन केले. त्यात फिथा फातिमा, मरीना मॅथ्यू, प्रमितकुमार देव बर्मन, नितीन चौधरी, राजीवकुमार चतुर्वेदी, लक्ष्मी एम. एस., रॉक्सी मॅथ्यू कोल यांचा सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च : क्लायमेट’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
हवेत सोडला जाणारा कार्बन डायऑक्साइड वनांमधील झाडे, वनस्पती शोषतात आणि त्याची साठवणूक खोड, फांद्या, पाने आणि मुळांमध्ये केली जाते. गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे आणि वाढत्या तापमानामुळे कार्बन उत्सर्जन वाढले आहे. मात्र, यामुळे वनांच्या कार्बन साठवणुकीत नेमके कसे बदल होतात, या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती. त्या पार्श्वभूमीवर, भविष्यात या कार्बन साठवणुकीत कसे बदल होतील, याचा अभ्यास नव्या संशोधनात करण्यात आला.
वनांतील कार्बन साठ्यावर तापमानापेक्षा पावसाचा प्रभाव अधिक असल्याकडे या संशोधनातून लक्ष वेधण्यात आले आहे. पावसातील बदलांचा जंगलांवरील परिणाम दोन ते चार वर्षांच्या विलंबाने दिसून येतो, तर तापमानाचा प्रभाव तुलनेने स्थिर असतो. जास्त उत्सर्जनामुळे कार्बन साठा वाढण्याच्या संकेतांमुळे हवामानातील बदल फायदेशीर न ठरता, तापमानवाढ, दुष्काळ, वणवे आणि कीड प्रादुर्भाव असे धोके वाढण्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
‘वनांतील कार्बनसाठा वाढत असताना, दाट जंगलांच्या स्थिरतेबाबत चिंता निर्माण होते आहे. ही वने कमकुवत झाल्यास भविष्यात उत्सर्जन वाढण्याचा, पर्यावरणीय लवचीकता कमी होण्याचा धोका वाढतो,’ असे शास्त्रज्ञ फिता फातिमा यांनी सांगितले.
भारतातील जंगलांचा हवामान बदलाला प्रतिसाद एकसारखा नाही. काही भागांत कार्बन साठा वाढला, तरी त्यामागे मोठे पर्यावरणीय धोके दडलेले असू शकतात. – रॉक्सी मॅथ्यू कोल, शास्त्रज्ञ, आयआयटीएम.
देशातील वनांवर होणाऱ्या हवामान बदलांच्या परिणामांच्या अभ्यासात संगणकीय प्रारूपाचा वापर करून भविष्यात वनांतील कार्बन साठवणूक वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रारूपात जमिनीतील पोषक घटकांच्या मर्यादा विचारात घेतलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात अधिक सखोल अभ्यास करून, प्रत्यक्ष क्षेत्रावर आधारित आणि पोषक घटकांचा विचार करणारी प्रारूपे विकसित करण्याची गरज आहे. – राजीव चतुर्वेदी, बिट्स पिलानी.
कार्बन साठवणुकीतील वाढीचे गणित
‘वने प्रतिचौरस मीटर ७.७४ किलो इतका सरासरी कार्बन साठवतात. या शतकाच्या अखेरीस ही सरासरी कमी उत्सर्जन झाले, तर १०.२४, मध्यम उत्सर्जन झाले, तर ११.७६ आणि जास्त उत्सर्जन झाले, तर प्रतिचौरस मीटर १३.६७ किलोग्रॅमपर्यंत वाढू शकते. म्हणजेच, सन २१०० पर्यंत वनांच्या कार्बन साठवणुकीत अनुक्रमे ३५ टक्के, ६२ टक्के किंवा ९७ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
मात्र, ही वाढ देशभर समान असणार नाही. वाळवंटी आणि अर्ध-शुष्क प्रदेशांत तापमान अधिक असल्याने सर्वाधिक वाढ होऊ शकेल. तर, हिमालयीन प्रदेश, गंगेचा मैदानी भाग, दख्खनचे पठार, पश्चिम घाट, ईशान्येकडील राज्यांमध्ये मर्यादित स्वरूपात वाढ होऊ शकेल,’ असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
