scorecardresearch

म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात

भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीचा विचार करता, २०२१-२२मध्ये आजवर सर्वाधिक बावीस टक्के निर्यात इजिप्तला झाली आहे

म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : देशातून होणाऱ्या मांस निर्यातीत म्हशीच्या मांसाचा वाटा वाढला आहे.  म्हशींच्या जागतिक मांस बाजारात देशाचा वाटा ४३ टक्के असून, मांस निर्यातीत देशाचा चौथा क्रमांक लागतो. चालू आर्थिक वर्षांत इजिप्तला सर्वाधिक मांस निर्यात झाली आहे.

कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये आजवर जगातील एकूण ६६ देशांना २४६१३,२३ कोटी रुपये किमतीच्या ११ लाख ७५ हजार १९३.०२ टन म्हशीच्या मांसाची निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीपैकी इजिप्तला सर्वाधिक ५५०८.५२ कोटी रुपये किमतीच्या २ लाख ८८ हजार ६०९ टन मांसाची निर्यात झाली आहे. त्या खालोखाल व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, इराक, हाँगकाँग, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, अरब अमिराती आणि जॉर्डन या प्रमुख दहा देशांचा क्रमांक लागतो.

जागतिक बाजाराचे चित्र

भारतातून सर्वाधिक म्हशीच्या मांसाचे निर्यात करणारे राज्य उत्तर प्रदेश आहे. त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. जागतिक आयातदार देशांचा विचार करता एकूण उलाढालीच्या सर्वाधिक १८ टक्के इतकी आयात जपान करतो. त्यानंतर चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगचा नंबर लागतो. भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीचा विचार करता, २०२१-२२मध्ये आजवर सर्वाधिक बावीस टक्के निर्यात इजिप्तला झाली आहे, त्या खालोखाल पंधरा टक्के व्हिएतनाम, चौदा टक्के मलेशिया, नऊ टक्के इंडोनेशिया आणि सात टक्के इराकला निर्यात झाली आहे. या प्रमुख दहा देशांसह एकूण ६६ देशांना मांस निर्यात होते, त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप खंडातील देश वगळता जगातील अन्य देशांचा समावेश होतो.

देशातून होणारी मांस निर्यात सन २०१४नंतर वाढली आहे. ही निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी राज्यात विविध ठिकाणी मोठे कत्तल करणारे, प्रक्रिया करणारे कारखाने उभारले आहेत. फलटण, सोलापूर, औरंगाबाद येथे हे कारखाने आहेत. पूर्वी फक्त मुंबईतून मांस निर्यात व्हायची. ग्रामीण भागात कारखाने सुरू झाल्यामुळे कुरेशी समाजाचा आणि अप्रत्यक्ष रीत्या या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडाला आहे.

सादिक कुरेशी, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, ऑल इंडिया जमीयतुल कुरेश अ‍ॅक्शन कमेटी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 03:42 IST

संबंधित बातम्या