scorecardresearch

भारताला गहू निर्यातीची मोठी संधी ; युद्धामुळे जागतिक बाजारात टंचाई; देशात अतिरिक्त साठा

देशातील गोदामे गव्हाने भरली आहेत आणि आता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू आहे.

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक अन्नधान्य बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेचा फायदा भारतातील गहू उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळू शकतो. देशातील गोदामे गव्हाने भरली आहेत आणि आता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू आहे. देशातील गव्हाचे उत्पादन सरासरी एवढे राहणार असल्याने गोदामातील गव्हाची निर्यात करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

युक्रेन-रशिया गव्हाचे मोठे निर्यातदार आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, चालू बाजार वर्षांत (जून २०२१ ते मे २०२२) जागतिक गव्हाच्या एकूण व्यवहारापैकी युक्रेन दहा टक्के तर रशिया सोळा टक्के निर्यात करू शकतो. मात्र, युद्धामुळे युक्रेनमधून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक  गेल्या काही दिवसांपासून बंदच आहे, तर रशियावर युरोपीयन देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यामुळे आणि युद्धजन्य स्थितीमुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाल्याने रशियातून होणारी गव्हाची निर्यात विस्कळीत झाली आहे.

उत्पादनाचा अंदाज..

अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भारतात यंदा गव्हासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात १० कोटी ७६ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी देशांतर्गत वापर १० कोटी ३६ लाख टन होणार आहे. १७ लाख ५ हजार टन निर्यात होऊन, आधीच शिल्लक असलेल्या गव्हाचा विचार करता देशात २ कोटी ७० लाख टन गहू शिल्लक राहील. गव्हाचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात गव्हाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. प्रति टन दर अमेरिकेत ५२५ डॉलर, ऑस्ट्रेलियात ३९५ डॉलर, युरोपीयन युनियनमध्ये ४६० डॉलर आणि कॅनडात ४७० डॉलर इतके होते. (एक डॉलर – ७६ रुपये १८ पैसे)

थोडी माहिती..

भारतातून गव्हाची निर्यात फक्त अफगाणिस्तानला सुरू होती. गेल्या महिन्यात सुमारे ९० हजार टन निर्यात झाली. ही निर्यात २२००-२३०० रुपये प्रति िक्वटल दराने होत होती. मात्र, जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून देशांतर्गत गव्हाचे दर २५००-२६०० रुपये प्रति िक्वटल झाले. या दराने अफगाणिस्तानला होणारी निर्यात परवडत नाही. त्यामुळे निर्यात बंद आहे.

प्रतिक्रिया

रशिया सर्वात कमी दरात गहू निर्यात करतो. त्याची निर्यात थांबल्याने भारताकडे मागणी होत आहे. पण, देशांतर्गत दरवाढ झाल्याने आपली निर्यात बंद झाली आहे. बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आखाती देशांना आपण निर्यात करतो.

राजेश शहा, व्यापारी, पुणे मार्केट यार्ड

देशातील स्थिती..

रब्बी हंगामातील गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. उत्पादन सरासरी इतके निघण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे एक एप्रिलपर्यंत ७० लाख ४६ हजार टन गहू शिल्लक असणे अपेक्षित असताना, मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत २ कोटी ३४ लाख टन गहू शिल्लक आहे. त्यामुळे भारतातून १ कोटी ५० लाख टन गव्हाची निर्यात होऊ शकते.

फायदा कसा?  युद्धामुळे जागतिक गव्हाच्या बाजारात सुमारे २६ टक्क्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीचा भारताला फायदा करून घेता येणे शक्य आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India get big opportunity to export wheat due to shortages in global markets zws

ताज्या बातम्या