पुणे : भारत- न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगांसाठी निर्यात क्षेत्रातील संधींची अनेक कवाडे खुली होणार आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथील उद्योगांना या निर्यात संधींचा मोठा फायदा होऊ शकतो. प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे आगामी काळात या भागात गुंतवणुकीसह रोजगारात वाढ होणार आहे.
‘महाराष्ट्रातून न्यूझीलंडला होणाऱ्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यानंतर रत्ने आणि दागिने, रसायने, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा क्रमांक लागतो. या करारामुळे निर्यातीतील अडथळे कमी होऊन, महाराष्ट्रातील उद्योगांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यातही देशातील प्रमुख उत्पादन केंद्रांपैकी एक असलेल्या पुण्याला अन्य क्षेत्रांबरोबरच माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानामुळे या कराराचा लक्षणीय फायदा होणार आहे,’ असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) म्हटले आहे.
‘महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया विशेषतः तयार खाद्यपदार्थ, मिठाई, पौष्टिक खाद्यपदार्थ, तसेच कृषी व्यवसायातील सेंद्रिय उत्पादने यांना शून्य निर्यात शुल्काचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. न्यूझीलंडची उच्च क्रयशक्ती आणि तेथील नागरिकांची आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची आवड, यामुळे दोन्ही उद्योगांना तेथे मोठ्या संधी आहेत. या करारामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि नवउद्यमींना (स्टार्टअप) फायदा अपेक्षित आहे. महिला आणि युवा उद्योजकतेला चालना देण्यावरही करारात विशेष भर देण्यात आला आहे,’ असे ‘एमसीसीआयए’ने नमूद केले आहे.
महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक केंद्र असल्याने या करारातून राज्याला निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक या तिन्ही आघाड्यांवर मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. या करारामुळे भारतीय वस्त्रोद्योग निर्यातीवर शुल्क नसेल आणि त्यातून नागपूर, इचलकरंजी, सोलापूर या जिल्ह्यांना निर्यात वाढवण्याची संधी मिळेल. अभियांत्रिकी वस्तू आणि वाहनांच्या सुट्या भागांसाठी न्यूझीलंडमध्ये बाजारपेठ विस्तारण्याची संधी आहे. पुणे आणि औरंगाबादच्या वाहननिर्मिती केंद्रासाठी हे फायदेशीर ठरेल. पुण्यातील मोठ्या औषधनिर्माण कंपन्यांना न्यूझीलंडमध्ये निर्यात व नियामक सहकार्यास चालना मिळू शकते.- संदीप रोकडे, सहसंचालक, उद्योग विभाग
भारत– न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील औषधनिर्माण, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, अन्नप्रक्रिया आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांसाठी निर्यातीच्या नव्या, दीर्घकालीन संधी उपलब्ध होणार आहेत. या करारामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ मिळेल आणि ओशनिया देशांबरोबर मजबूत आर्थिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. तसेच राज्याचे जागतिक पुरवठा साखळीतील स्थान अधिक बळकट होईल.- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए
