पुणे : आखातातील युद्धाचे सावट असताना भारताने तांदूळ निर्यातीची परंपरा कायम ठेवली आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत भारतातून १२.२७ दशलक्ष टन तांदूळ निर्यात झाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत भारतातून ११.६८ दशलक्ष टन तांदूळ निर्यात झाला होता. आखाती युद्धाचे सावट असताना तांदूळ निर्यातीत पाच टक्के वाढ झाली आहे.
भारत, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान या देशात तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जागतिक बाजारपेेठेची गरज विचारात घेऊन एकूण निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. गेल्या वर्षी नाेव्हेंबर महिन्यात नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला. पाऊस चांगला झाल्याने तांदूळ लागवडीत वाढ झाली. थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान या देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे दर जागतिक स्तरावर कमी आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत भारतातून तांदळाची निर्यात चांगली झाली. भारतीय बासमतीला आखाती देशातून चांगली मागणी असते. आखातातील युद्धामुळे यंदा बासमतीची निर्यात कमी झाली. गेल्या सहा महिन्यांत ३.७ दशलक्ष टन एवढी बासमती तांदळाची निर्यात झाली. मात्र, बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली. यंदा बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत नऊ टक्क्यांनी वाढ झाली. बांगलादेश, आफ्रिका खंडातील देश, तसेच श्रीलंकेकडून भारतीय बिगर बासमती तांदळाची निर्यात केली जाते’, अशी माहिती मार्केट यार्डातील तांदूळ व्यापारी, निर्यातदार जयराज अँड सन्स कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.
‘गेल्या सहा महिन्यांत निर्यातीत पाच टक्के वाढ झाली. जुलै महिन्यापासून निर्यातीत अडचणी आल्या आहेत. मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धा आहे. अडचणींमुळे निर्यातीवर परिणाम होतो. जहाजाद्वारे तांदूळ परदेशात निर्यात केला जातो. त्यासाठी मोठे कार्गो कंटेनर आपल्याकडे उपलब्ध नाहीत’, असे त्यांनी नमूद केले.
निर्यातदारांपुढे संकट
‘तांदूळ वाहतुकीच्या खर्चात खूप मोठी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी जहाजाद्वारे तांदूळ (शिपमेंट) पाठविण्यासाठी १५०० ते दोन हजार डाॅलर एवढा खर्च येत होता. सध्या हा खर्च सात हजार ते साडेसात हजार डाॅलरपर्यंत गेला. हा खर्च परदेशी व्यापाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे निर्यातदारांपुढे संकट उभे राहिले आहे’, याकडे तांदूळ व्यापारी, निर्यातदार धवल शहा यांनी लक्ष वेधले. पुढील काही महिने अशी परिस्थिती राहिल्यास निर्यातीचे लक्ष्य गाठणे अवघड होईल. आपल्या देशात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. वाहतुकीसाठी कार्गो कंंटनेर उपलब्ध होत नाहीत. कंटनेरचे भाडे तिप्पट झाले आहे. केंद्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तांदूळ निर्यातीवर परिमाण होईल’, असे त्यांनी नमूद केले.
बासमती, बिगर बासमती तांंदळाची निर्यात वाढविणे तसेच पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या देशांसोबत स्पर्धा करायची असेल तर बिगर बासमती, बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्गो कंटेनर भाड्याचे दर त्वरित कमी करायला हवेत, तसेच कार्गो उपलब्ध करून द्यायला हवेत.- धवल शहा, तांदूळ निर्यातदार, मार्केट यार्ड
