पुणे : देशातील पहिला डॉल्बी सिनेमा पुण्यात सुरू झाला आहे. खराडीतील सिटी प्राइड चित्रपटगृहात त्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. या सिनेमात डॉल्बी व्हीजन तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट दर्जाची दृश्यात्मकता आणि डॉल्बी ॲटमॉस तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचा ध्वनी यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांसाठी उद्यापासून (शुक्रवार) डॉल्बी सिनेमा खुला होत आहे.
जागतिक स्तरावर आतापर्यंत डॉल्बी व्हीजन आणि डॉल्बी ॲटमॉसमध्ये ७४० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. भारतात पुण्यानंतर हैदराबाद, बंगळुरू, त्रिची, कोची आणि उलीक्कल येथे डॉल्बी सिनेमा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत डॉल्बी लॅबोरेटरीजचे उपाध्यक्ष मायकेल आर्चर म्हणाले, की पुण्यात डॉल्बी सिनेमा सुरू करणे हे भारतातील आमच्या दीर्घकालीन धोरणातील महत्त्वाचे पाऊल आहे.
भारतात हजाराहून अधिक डॉल्बी ॲटमॉस स्क्रीन आहेत. आता डॉल्बी सिनेमा भारतातील चित्रपट मनोरंजनामध्ये नवीन मापदंड स्थापित करेल. आम्ही आघाडीचे चित्रपटनिर्माते, स्टुडिओ व प्रदर्शकांसोबत अधिकाधिक डॉल्बी सिनेमा सुरू करणार आहोत. त्यातून भारतीय प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा चित्रपट पाहण्याचा अनुभव मिळेल.
सिटी प्राइड मल्टिप्लेक्सेसचे भागीदार पुष्कराज चाफळकर म्हणाले, की चाफळकर कुटुंबाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आमच्या पहिल्या चित्रपटगृहासह १९३९ मध्ये सुरू झाला. एका पडद्यावरून आज महाराष्ट्रात ४० पडद्यांपर्यंतचा आमचा प्रवास झाला आहे. डॉल्बी ॲटमॉस स्क्रीनवरून देशातील पहिला डॉल्बी सिनेमा सुरू करण्याचा अभिमान वाटतो. पुणेकरांची चांगल्या दर्जाच्या मनोरंजनाची आवड असून, डॉल्बी सिनेमा त्यांच्यासाठी पर्वणी ठरेल.
डॉल्बी सिनेमाची वैशिष्ट्ये :
डॉल्बी सिनेमात डॉल्बी व्हीजन तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाची आणि प्रभावी दृश्यात्मकता प्रेक्षकांना अनुभवता येते. याच जोडीला डॉल्बी ॲटमॉसचे ध्वनी तंत्रज्ञान आहे. डॉल्बी सिनेमामध्ये डॉल्बी व्हीजन ड्युअल ४ के लेझर प्रोजेक्शन सिस्टीमचा दर्जा आहे. यामुळे चित्रपटातील दृश्ये आणखी उजळ, सुस्पष्ट आणि अधिक तपशिलांसह दिसण्यास मदत होते. डॉल्बी सिनेमामध्ये डायनॅमिक लायटिंग, आरामदायी आसन व्यवस्था, व्यत्यय कमी करण्यासाठी काळजीपूर्वक रचना केलेले प्रेक्षागृह आणि वक्राकार पडदा आहे. त्यामुळे या सिनेमात २डी आणि ३डी चित्रपट अधिक अगदी समोर घडत असल्यासारखे वाटावेत, या पद्धतीने प्रेक्षकांना अनुभवता येतात.