पुणे : गुटगुटीत मुले ही सर्वसाधारणपणे कोणत्याही कुटुंबात कौतुकाचा विषय असतो. मात्र, हा विषय कौतुकाचा नव्हे तर चिंतेचा आहे, असा इशारा डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. भारतात तर सुमारे एक कोटी ४४ लाख मुलांना लठ्ठपणाचा विकार आहे. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाच्या क्रमवारीत देशाचे जगातील स्थान हे चीनपाठोपाठ दुसरे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा जगातील काही भागांत मुलांमधील लठ्ठपणा जागृती सप्ताह (चाइल्ड ओबेसिटी अवेअरनेस वीक) म्हणून साजरा केला जातो. लठ्ठपणाचा विकार असलेली बहुतांश मुले मोठी झाल्यावरही लठ्ठच राहतात, त्यातून त्यांना मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार लवकर होण्याचा धोकाही कायम असतो, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टर देतात.

भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, की  आमच्याकडे येणाऱ्या १०० पैकी १० मुलांना लठ्ठपणा असतो. आपल्याकडे गुटगुटीत मूल म्हणजे निरोगी मूल असा समज आहे. तो तेवढा खरा नाही. मुलांमधील गुटगुटीतपणा हा एका मर्यादेनंतर अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. त्यासाठी बालरोगतज्ज्ञ आणि पालक यांनी सुरुवातीपासूनच मुलांचा ‘ग्रोथ चार्ट’ नोंदवत राहणे आवश्यक आहे.

सध्याच्या काळात पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. त्याची भरपाई म्हणून बाहेरचे, ‘जंक फूड’ खायला घालण्याकडे कल दिसतो. हे चुकीचे आहे. करोनाकाळात घरात बंद राहिल्यानंतर मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षणही डॉ. जोग यांनी या वेळी नोंदवले.

आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांमध्ये १० ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांनाही वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्यावर आहाराबाबत निर्बंध घालायचे नाहीत, असे आहारशास्त्रामध्ये शिकवले जाते. मात्र, लठ्ठ मुलांना त्यांच्या वजनामुळे अनेक त्रास होतात. जीवनशैलीजन्य आजारांच्या धोक्यांचे वयही आता अलीकडे आले आहे. त्यामुळे मुलांसाठी आहार नियोजन करणे आवश्यक ठरत आहे. 

दरम्यान, मुलांच्या दैनंदिनीमध्ये दररोज किमान एक तास दमवणारा व्यायाम किंवा खेळ आणि चौरस पौष्टिक आहार यांचा समावेश करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

डॉक्टर, आहारतज्ज्ञांचा सल्ला

*मैदा आणि साखरेचे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा

*पाकिटबंद पदार्थ घरी आणण्यावर निर्बंध आवश्यक

*दररोज घरी केलेले सकस पदार्थ जेवणात द्या

*भरपूर दमवणाऱ्या खेळांचा समावेश करा

* ‘जंक फूड’ला पर्यायी पौष्टिक पदार्थ द्या

* चांगला आहार, व्यायाम या बाबींचा अंतर्भाव पालकांनीही त्यांच्या वेळापत्रकात करावा, म्हणजे मुले त्याचे अनुकरण करतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India second in obesity among children zws
First published on: 03-07-2022 at 02:30 IST