scorecardresearch

२० वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण!

हवामान बदल हे सर्वात मोठे संकट असल्याने आता हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर अपरिहार्य आहे.

मुकेश अंबानी यांचे मत

पुणे : हवामान बदल हे सर्वात मोठे संकट असल्याने आता हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर अपरिहार्य आहे. पुढील वीस वर्षांत भारत हरित आणि स्वच्छ ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्यास ५०० अब्ज डॉलर्सची निर्यात करून जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असे मत रिलायन्स उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी बुधवारी मांडले. सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) भारत आता जपान आणि युरोपीय महासंघाला मागे टाकून २०३० पर्यंत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ या ऑनलाइन परिषदेत ‘शाश्वत भविष्यासाठी हरित ऊर्जा’ या विषयावर अंबानी यांच्याशी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संवाद साधला. ‘रेझिलियंट ग्लोबल ग्रोथ  इन पोस्ट पँडेमिक वल्र्ड’ या संकल्पनेवर ही परिषद होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची येत्या काळातील वाटचाल, आशियातील भारताचे स्थान, हरित ऊर्जा अशा विविध विषयांवर अंबानी यांनी भाष्य केले.

जागतिक अर्थव्यवस्थेचे केंद्र पुन्हा आशियाकडे सरकले आहे. सर्वसमावेशक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून आशियाची वाटचाल सुरू आहे. लोकशाही आणि विकास यातील दरी आता संपते आहे. २०३० पर्यंत जगाच्या विकासातील ६० टक्के योगदान आशियाचे असेल असे अंबानी यांनी सांगितले. पर्यावरणपूरक औद्योगिक क्रांतीची गरज व्यक्त करून अंबानी म्हणाले, की ऊर्जा संक्रमण भूराजकीय नेतृत्व ठरवते. इंधनासाठी कोळशाचा वापर सुरू झाल्यावर युरोपने भारत आणि चीनला मागे टाकून जागतिक नेतृत्व मिळवले. त्यानंतर तेलाचा वापर सुरू झाल्यावर अमेरिका आणि पश्चिम आशियाई देशांकडे जगाचे नेतृत्व आले. गेल्या वीस वर्षांत भारत माहिती तंत्रज्ञानातील महासत्ता झाला, तर पुढील वीस वर्षांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊर्जा आणि जैवविज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकेल. दरम्यान या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India self sufficient green energy in 20 years ysh

ताज्या बातम्या