पुणे : अलीकडे मैदानच नाही, तर मैदानाबाहेरही क्रीडा क्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या आहेत. यामुळेच खेळामध्ये कारकीर्द घडविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. त्यामुळे देशात क्रीडासंस्कृती खोलवर रुजविण्यासाठी उद्योजकांनी शिक्षण आणि आरोग्याप्रमाणेच क्रीडा क्षेत्रासाठीही निधी खर्च करावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बुधवारी येथे केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात खडसे बोलत होत्या. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले या वेळी उपस्थित होते. भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. यासाठी देशात क्रीडासंस्कृती रुजण्याची आवश्यकता आहे. खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत हे प्रयत्न यापूर्वीच सुरू झाले आहेत. सध्या युवा वर्गही मोठ्या प्रमाणावर क्रीडा क्षेत्राकडे वळू लागला आहे. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही खेळामध्ये कारकीर्द घडवता येऊ शकते हे युवकांना कळू लागले आहे, असे खडसे म्हणाल्या.
‘पूर्वी क्रीडा आणि युवा विभागाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून गावखेड्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी देशात १०० ‘साइ’ केंद्रे आणि खेलो इंडिया केंद्रांचे जाळे उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘माय भारत’ या अन्य एका संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर युवक एकवटले जात आहेत. आतापर्यंत सव्वादोन कोटी युवकांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली असल्याची माहितीही रक्षा खडसे यांनी या वेळी दिली.
अर्जुन पुरस्कारात राज्यातील खेळाडूंवर अन्याय होत असल्याची विचारणा खडसे यांच्याकडे केली असता, माझ्यापर्यंत या गोष्टी आल्या असून, यात आपण लक्ष घालू असे त्यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्याने क्रीडा कायद्याची अंमलबजावणी
देशातील क्रीडा संघटना आणि खेळ याबाबत अनेक प्रश्न उपस्थित आहेत. अनेक संघटना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. न्यायालयीन लढाईत अडकलेल्या या वादांमुळे खेळ आणि खेळाडूंवर परिणाम होत आहे असे निदर्शनास आल्यावर आता सरकारच्या वतीने क्रीडा कायदा करण्यात आला असून, एक पारदर्शी क्रीडा क्षेत्र भविष्यात बघायला मिळेल असा विश्वासही रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. खेळामधील वाद मिटविण्यासाठी आता खेळाडूंना न्यायालयात जावे लागणार नाही. क्रीडा कायद्यांतर्गत क्रीडा लवादाची नियुक्ती करण्यात येणार असून, भविष्यात सर्व प्रश्न या लवादामार्फतच सोडविण्यात येतील. यासाठी क्रीडा कायद्याच्या अंमलबजाणीची सुरुवात टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

