माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महासत्ता आहे हा निव्वळ भ्रमच आहे. आपण अजूनही कोिडगमध्येच अडकलो आहोत. संगणकाचे उत्तम ज्ञान असलेली मंडळी अजूनही कमीच आहेत, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केले.
मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे शोभा बोंद्रे आणि सतीश जोशी यांनी लिहिलेल्या ‘सहावं महाभूत आणि मी!’ या पुस्तकावरील चर्चेत ते बोलत होते. बोंद्रे यांनी गोडबोले आणि जोशी यांच्यासह मायक्रोसॉफ्ट कंपनीतील माजी वरिष्ठ अधिकारी मकरंद गद्रे यांच्याशी संवाद साधला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माहितीचा खजिना या चर्चेतून खुला झाला. अशोक कोठावळे यांनी सर्वाचे स्वागत केले.




माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भविष्याची वाट सुकर असेल असे वाटत नाही, हा मुद्दा स्पष्ट करताना गोडबोले म्हणाले, की संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या ५० टक्के जागा रिकाम्या आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले ८० टक्के विद्यार्थी नोकरीसाठी पात्र नसतात.
त्यांना तांत्रिक ज्ञान कमी असते. त्यामुळे उद्योगांना त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घ्यावे लागते. एकेकाळी पोस्टात काम करावे तसा युवक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत होता. मात्र, सॉफ्टवेअर क्षेत्रातही स्वयंचलित होण्याचे प्रमाण वाढले असल्याने ६८ टक्के लोकांचे रोजगार जातील. सर्जनशील काम करणाऱ्या व्यक्तीच या क्षेत्रात तरून जातील.
सौदी अरेबियासाठी उजवीकडून डावीकडे असे अरेबिक भाषेत करून दिलेल्या सॉफ्टवेअरची हकीकत सांगून गद्रे यांनी वेगवेगळ्या देशांतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांबरोबर काम करताना आलेले अनुभव सांगितले. नॅशनल मिल्क रेकॉर्ड या संस्थेसाठी गाईंच्या २० पिढय़ांची माहिती जतन करून प्रत्येक गाईला युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच आधार क्रमांक देण्यात आला आहे, असे जोशी यांनी सांगितले.