पुणे : स्वीडनमधील उद्योगांच्या सर्वेक्षणात जगातील व्यवसायस्नेही वातावरण असलेल्या देशांमध्ये भारताने पहिले स्थान पटकावले आहे. दोन्ही देशांमध्ये नवतंत्रज्ञान, पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रात भागीदारी वाढविण्यात येत आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार दुपटीने वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती स्वीडनचे भारतातील व्यापार आयुक्त एरिक ओदार यांनी दिली.

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि उद्योगांमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारत आणि स्वीडन यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ‘इंडिया–स्वीडन इनोव्हेशन्स ॲक्सिलरेटर’ (आयएसआयए) या उपक्रमाची २८ वी कार्यशाळा पुण्यात झाली. यावेळी ओदार बोलत होते. याप्रसंगी स्वीडिश एनर्जी एजन्सीचे वरिष्ठ व्यवसाय विकास अधिकारी निल्स हेनोख, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे चॅप्टरच्या कोअर कमिटी सदस्य प्रणती श्रॉफ मुनोत आदी उपस्थित होते. भारतात नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी, तंत्रज्ञान पुरवठादार आणि शाश्वत विकास क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

‘आयएसआयए’ उपक्रमांतर्गत स्वीडनमधील पर्यावरणपूक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत केली जाते. त्याचबरोबर भारतीय उद्योगांना परिणामकारक ठरलेल्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळविणे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या कार्यशाळेत ६० हून अधिक भारतीय कंपन्या आणि स्वीडनमधील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रातील ७ कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. ऊर्जा साठवणूक, संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरणपूरक ऊर्जा, जलव्यवस्थापन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि डिजिटल उपाययोजना तसेच हरित प्रणोदन तंत्रज्ञानासह पर्यावरणपूरक वाहतूक अशा विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

तंत्रज्ञान भागीदारी यशस्वी

‘आयएसआयए’ उपक्रमाने भारत आणि स्वीडन यांच्यातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ८० हून अधिक प्रगत पर्यावरणपूरक तंत्रज्ञानांची भारतीय बाजारपेठेत ओळख करून देण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमध्ये २५० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांना चालना मिळाली असून, ५० हून अधिक औद्योगिक भागीदाऱ्या घडवून आणण्यात आल्या आहेत, असे व्यापार आयुक्त एरिक ओदार यांनी सांगितले.

स्वीडनमधील उद्योगांच्या पसंतीक्रमावरील देश

१) भारत

२) आयर्लंड

३) व्हिएतनाम

४) पोलंड

५) डेन्मार्क