पुणे : कोळसा वाहतूक करणाऱ्या रेल्वे रेकची संख्या वाढल्याने कोळशावर आधारित देशांतर्गत वीज केंद्रांमधील साठा १७४ लाख टनांवरून १८१ लाख टनांवर पोहोचला. त्यामुळे गंभीर टंचाई असलेल्या केंद्रांची संख्याही १०० वरून ८५ पर्यंत कमी झाली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (सीईए) ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
कोळसा खाणी असलेल्या भागातच पडलेला पाऊस आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे इंधन पातळी गंभीर झालेल्या केंद्रांची संख्या वाढली होती. या महिन्यात गेल्या बुधवारी (२१ ऑक्टोबर) देशातील १९१ मधील १०० औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांवरील कोळसा साठा चिंताजनक पातळीवर असल्याचे नोंदविण्यात आले होते. आता कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे रेकची संख्या वाढविण्यात येत असून, ४९० हून अधिक रेल्वे रेक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये कोळसा वाहतुकीसाठी सरासरी ४७२ रेक धावले.
दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रांपर्यंत कोळसा पोहोचविण्यासाठी पुरवठा साखळी सक्षम करण्यात येत असल्याचे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते.
महानिर्मिती प्रकल्पांची स्थिती थोडी बरी
काही दिवसांपूर्वी ‘महानिर्मिती’च्या भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस, परळी या सातही प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा चिंताजनक पातळीवर होता. हे प्रकल्प सुमारे १० हजार २०० मेगावॅट क्षमतेने चालतात. या प्रकल्पांमध्ये कोळशाचा ३५.१३ लाख टन नियमन साठा असणे गरजेचे आहे. त्यातील खापरखेडा आणि पारस प्रकल्पांमधील कोळशाच्या साठ्यात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) वाढ झाली असून, सातही प्रकल्पांमधील कोळशाचा साठा ५.६७ लाख टनांवर पोहोचला आहे. हा साठा गेल्या बुधवारी (२१ ऑक्टोबर) ५.५६ लाख टन इतका होता.
