पुणे : देशाच्या अतिदुर्गम सीमांवर तैनात असलेल्या जवानांना आता सहजपणे तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येणार आहे. ‘सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेने (एएफएमएस) ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ची (एबीडीएम) अंमलबजावणी सुरू करून डिजिटल क्रांतीचा स्वीकार केला असून, ‘इस्रो’च्या उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे टेलिमेडिसिन यंत्रणेचा विस्तार करण्यात येत आहे.
पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) आयोजित ‘आर्मेडिकॉन २०२६’ परिषदेत सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेच्या महासंचालक व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. लष्करी वैद्यकीय सेवा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि रुग्णकेंद्रित करण्यात येत आहे.
आतापर्यंत लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्या वेगवेगळ्या स्तरावर होणाऱ्या वैद्यकीय नोंदी आणि व्यवस्थापन आता ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टिम’ (एचआयएमएस) या एकाच मंचावर आणण्यात येत आहेत. या एकात्मिक डिजिटल सुविधेद्वारे जवानांची आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे उपचारांमध्ये सातत्य राखणे सोयीचे होणार आहे, असे सरीन यांनी सांगितले.
‘देशाच्या दुर्गम भागात इस्रोच्या ‘स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर’च्या (एसएएसी) सहकार्याने टेलिमेडिसिन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहेत. या उपग्रह आधारित यंत्रणेमुळे सीमेवरील जवान थेट शहरातील लष्करी रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधू शकतील. या प्रणालीचा झपाट्याने विस्तार करण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत हे तंत्रज्ञान जवानांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. लष्करी वैद्यकीय सेवा आता ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’शी जोडण्यात येत आहे. त्यामुळे जवानांची आरोग्यविषयक माहिती सुरक्षितपणे जतन केला जाईल,’ असेही सरीन यांनी स्पष्ट केले.
अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित
संसर्गजन्य आजारांचे तातडीने निदान करण्यासाठी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) अत्याधुनिक ‘बीएसएल-२’ ही राज्यस्तरीय विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच ‘विषाणू संवर्धन प्रयोगशाळा’ही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभावी लस आणि उपचार विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन करणे शक्य होणार आहे.
‘वन हेल्थ’ या राष्ट्रीय आराखड्यांतर्गत या प्रयोगशाळा देशाच्या आरोग्य सुरक्षेचे कवच म्हणून काम करतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्वदेशी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या समन्वयातून भारतीय सशस्त्र दलाची वैद्यकीय सेवा भविष्यातील कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
