पुणे : ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात समावेश असलेल्या लष्करातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १६ पदके पटकाविली. त्यात आठ सुवर्ण, सात रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. लष्करातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशामध्ये लष्कराच्या ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’चे महत्त्वाचे योगदान आहे.

संरक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकूण ३९ पदके पटकाविली. १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य अशा एकूण ३९ पदकांसह पदकतालिकेत भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले. भारतीय संघात लष्करातील २० खेळाडूंचा समावेश होता. ज्युदो, बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग अशा क्रीडा प्रकारांमध्ये लष्करातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १६ पदके मिळवली.

पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षित खेळाडूंनी ६ सुवर्ण, ५ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण १२ पदके जिंकण्याची कामगिरी केली. त्यातही लष्कराच्या बॉक्सिंग खेळाडूंनी आठ पदकांची कमाई केली. यापूर्वीही आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. त्यात २०१८मध्ये सात, २०२२मध्ये आठ पदके मिळवली होती. क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता ओळखून त्यांची जोपासना करणे, खेळाडू विकसित करण्यासाठी लष्करातर्फे २००१मध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटची पुण्यात स्थापना करण्यात आली. दोन दशकांनंतर आता देशातील सर्वाधिक यशस्वी, उच्च कामगिरी परिसंस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. पारंपरिक प्रशिक्षण केंद्रांपेक्षा वेगळ्या प्रशिक्षणासह खेळाडूंच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षक, क्रीडा विज्ञान, फिजिओथेरपी, आहार, बायोमेकॅनिक्स, पुनर्वसन व्यवस्थापन, कामगिरीचे विश्लेषण अशा विविध अंगांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले जाते. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट देशातील महत्त्वाची क्रीडा संस्था म्हणून नावारूपाला आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

लष्कराचे पदकविजेते खेळाडू

राष्ट्रकुल स्पर्धेत हवालदार हर्ष यांनी ज्युदोमध्ये, नायब सुभेदार प्रीती आणि जस्मीन, हवालदार साक्षी, अरुंधती, सचिन, अंकुश यांनी बॉक्सिंगमध्ये, सुभेदार सोमन राणा यांनी पॅरा शॉटपूटमध्ये सुवर्णपदक पटकाविले. नायब सुभेदार सर्वेश यांनी उंच उडीमध्ये, नायब सुभेदार गुलवीर यांनी १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत, हवालदार अजय बाबू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये, लेफ्टनंट कर्नल नीरज चोप्रा यांनी भालाफेकीत, हवालदार जादुमणी यांनी बॉक्सिंगमध्ये, लान्सनायक शुभम जुयाल यांनी पॅरा शॉटपूटमध्ये, तर सुभेदार नरेंदर यांनी बॉक्सिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. नायब सुभेदार गुलवीर यांनी पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवल्याची माहिती लष्कराने दिली.