पुणे : ‘संरक्षण आणि स्फोटक उद्योगांमधील अपघात पूर्णपणे थांबले पाहिजेत. सुरक्षा मानके आणि पुरेसे नियम असूनही मानवी निष्काळजीपणा आणि प्रक्रियेतील शिथिलतेमुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे संरक्षण उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संवेदक, सीसीटीव्ही, विदा विश्लेषण, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी चुका कमी करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार यांनी केले.
संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘संरक्षण गुणवत्ता आश्वासन महासंचालनालया’तर्फे (डीजीक्यूए) ‘लष्करी स्फोटके आणि प्रणोदक : सुरक्षा व अनुपालन’ या चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी संजीवकुमार बोलत होते. संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉ. गरिमा भगत, ‘डीजीक्यूए’चे महासंचालक एन. मनोहरन, नियंत्रक डॉ. टी. के. वरदराजन या वेळी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत सरकारी आणि खासगी संरक्षण कारखान्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा संदर्भ देत संजीव कुमार म्हणाले, ‘अपघातानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, कुटुंबाचे झालेले भावनिक आणि मानसिक नुकसान कोणत्याही स्वरूपात भरून काढता येत नाही. त्यामुळे उच्च स्फोटके आणि प्रणोदकांच्या (प्रोपलंट) हाताळणीत सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. समितीच्या अहवालानुसार, देशात ‘सीएफईईएस’ आणि ‘पीईएसओ’ अशा संस्थांनी उत्कृष्ट सुरक्षा मानके आणि नियमावली विकसित केली आहे. नियमांची कोणतीही कमतरता नाही.’
अनेक वर्षे एकाच प्रक्रियेत काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आत्मसंतुष्टता आणि निष्काळजीपणा निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच दुर्घटनेचा धोका वाढतो. त्यामुळे सुरक्षा प्रक्रियेची अंमलबजावणी केवळ मानवी देखरेखीवर न सोडता त्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यंत्रसामग्री, कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन यांच्यावर देखरेख करणाऱ्या प्रणालींची गरज आहे. सर्व माहिती केंद्रीय यंत्रणेकडे तत्काळ पाठवल्यास संभाव्य धोके आधीच ओळखून अपघातांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असेही संजीव कुमार यांनी नमूद केले.
‘आजही स्फोटकांचे महत्त्व टिकून’
‘आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी आजही स्फोटकेच सर्वांत प्रभावी आणि मुख्य घटक आहेत. उच्च ऊर्जाक्षमता असलेली स्फोटके आणि प्रणोदक हाताळताना सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यास मोठी जीवित, वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे उत्पादनापासून विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे,’ असे मत एन. मनोहरन यांनी मांडले.
परवाना प्रक्रियेत सुलभता
‘संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना, नव्या कारखान्यांच्या उभारणीला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने परवाना प्रक्रियेत धोरणात्मक सुलभता आणली आहे. पूर्वी उद्योगांना परवान्यासाठी प्रशासकीय पातळीवर तब्बल १९ विविध संस्थांशी सल्लामसलत करावी लागत होती. आता ही संख्या थेट ३ मुख्य घटकांवर आणण्यात आली आहे,’ असे संजीव कुमार यांनी सांगितले.
