Indian Army Vikram VT-21 Armored Vehicle Prototype: भारतीय लष्करातील यांत्रिक पायदळाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अहिल्यानगर येथील वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हीआरडीई) ‘विक्रम व्हीटी-२१’ कार्यक्रमांतर्गत पुढील पिढीतील ट्रॅक आणि चाक या प्रकारातील चिलखती वाहनांची प्रारुपे दोन खासगी भागीदारांच्या सहाय्याने विकसित केली असून, सर्व स्तरांवरील चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करून पुढील तीन वर्षांत ही वाहने लष्करात दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे

(डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या हस्ते शनिवारी वाहनांच्या प्रारुपांचे फॉ ध्वजारोहण कार्यक्रम अहिल्यानगर येथे झाला. आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंगचे महासंचालक डॉ. प्रतीक किशोर, उत्पादन समन्वय आणि सेवा संवाद विभागाच्या (पीसी अँड एसआय) महासंचालक, डॉ. चंद्रिका कौशिक, व्हीआरडीईचे संचालक जी. राममोहन राव, भारत फोर्जचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे सुक्रंत सिंग या वेळी उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील आधुनिक यांत्रिक पायदळाच्या चिलखती वाहनांचा अभ्यास करून ‘विक्रम व्हीटी २१’ हे वाहन तयार करण्यात आले आहे. डीआरडीओने मूलभूत तंत्रज्ञान विकसित करून ते प्रत्यक्ष उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रातील भागीदारांकडे हस्तांतरित करण्यात आले. डॉ. कामत म्हणाले, विकसित प्रारुप वाहनांची आता चाचणी घेतली जाणार आहे. त्यात डीआरडीओ आणि लष्कर या दोन्ही स्तरांवर चाचणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे लष्कराच्या गरजा पूर्ण करता येतील.

दोन्ही वाहने २०२९ पर्यंत लष्कराच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या जगात भारताने संरक्षण व्यवस्था आणि संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होणे अत्यावश्यक आहे. २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संरक्षणक्षमता भक्कम असली पाहिजे, जेणेकरून शत्रूमुळे देशाची अर्थव्यवस्थेच्या वाढीत अडथळा येणार नाही. त्यामुळे ‘आत्मनिर्भरता’ ही केवळ घोषणा नाही, तर ती अपरिहार्यता आहे. केवळ तीन वर्षांत डिझाइनपासून प्रारुपापर्यंतचा टप्पा गाठणे ही मोठी कामगिरी आहे. परदेशी अवलंबित्त्व कमी करण्यासाठी डिझाइन प्रणालीप्रमाणेच उपप्रणाली, महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर काम करणे ही जबाबदारी सरकारने डीआरडीओवर सोपवली आहे.

भारतीय लष्कराच्या यांत्रिक पायदळाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याने २००५ मध्ये फ्यूचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेइकल ही संकल्पना पुढे आली. त्यावेळी २०१७ पर्यंत या प्रणाली लष्करात समाविष्ट करण्याचा विचार होता. मात्र, विविध तांत्रिक अडचणींमुळे ते साध्य झाले नाही. मात्र, २०२२मध्ये व्हीआरडीईने जबाबदारी घेतल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत प्रारुप तयार झाले. डीआरडीओ आणि उद्योग यांच्यातील समन्वयामुळे हे शक्य झाले, असे डॉ. चंद्रिका कौशिक यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

भारतीय सैन्य गेली तीन दशके रशियन बनावटीच्या बीएमपी २ या पायदळ चिलखती वाहनांच्या जुन्या ताफ्याच्या बदलासाठी प्रयत्नशील आहे. सध्या यांत्रिक पायदळ दलाचा कणा असलेली ही वाहने आता कालबाह्य ठरत असल्याचे मानले जाते. या अनुषंगाने व्हीआरडीईचे संचालक जी. राममोहन राव म्हणाले, अन्य प्रयोगशाळांच्या मदतीने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्यामुळे आता चार दशके जुनी प्रणाली बदलली जाणार आहे. २०२२मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली. २९२ कोटी रुपयांचा निधी मिळाला.

२०२३ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून २०२६मध्ये आता प्रारुप सादर करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. जर्मनीच्या प्युमा, रशियन बीएमपी ३ अशा सर्वोत्तम प्रणालींच्या तोडीचे प्रारुप विकसित करण्यात आले आहे. यात अत्याधुनिक करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे पटकन लक्ष्य ओळखणे, शस्त्र निवड करणे सुलभ होणार असल्याने जवानांचा प्रतिसाद कालावधी कमी होईल. तसेच कारवाईदरम्यान उपयुक्त ठरणारी प्रगत भू-नकाशीकरण प्रणालीही या वाहनांत असेल.