पुणे : ‘तीनही सैन्यदलांत समन्वय राखण्यासाठी राबवण्यात येत असलेली ‘थिएटरायझेशन’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन-तीन वर्षात सैन्यात ‘थिएटर कमांड’ असित्त्वात येताना दिसतील,’ असा विश्वास देशाचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षांत संचलनानंतर द्विवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा या वेळी उपस्थित होते.

थिएटरायझेशनच्या रखडलेल्या प्रक्रियेविषयी बोलताना द्विवेदी म्हणाले,‘थिएटरायझेशनबाबतच्या सर्व चर्चा चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीमध्ये पूर्ण झाल्या असून, त्याचा अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. सध्या विविध पातळींवर त्याचा आढावा घेण्यात येत आहे.’

‘तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय साधताना संबंधित अधिकाऱ्यांना तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सैन्याची उभारणी, प्रशिक्षण आणि देखभालीची जबाबदारी सैन्यदल प्रमुखांकडे, तर मोहीमेवेळी तीन्ही दलांमधील समन्वयाची, प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी थिएटर कमांडरवर असेल, अशी रचना नव्याने करण्यात येत आहे. देशाच्या नवीन लष्करप्रमुखांच्या नेतृत्वात येत्या दोन ते तीन वर्षांत ही व्यवस्था प्रत्यक्षात पाहायला मिळेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन सिंदूर २.०’कडे लक्ष वेधले असता द्विवेदी म्हणाले,‘सध्या प्रत्यक्ष युद्धावर तात्पुरती बंदी आहे. मात्र ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही. आता लष्कर, नौदल आणि हवाई दल मिळून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज होत आहेत.’

‘प्रत्येक जवानाकडे ‘ड्रोन’’

‘प्रत्येक जवानाच्या हातावर ड्रोन म्हणजेच ‘ईगल ऑन द आर्म’साठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता बदलत्या युद्ध काळात सैन्यातील प्रत्येक जवानाला ‘ड्रोन’ उडवण्याची, ते हाताळण्याबरोबरच ‘ड्रोन’ प्रतिरोधक तंत्राचे कौशल्यही आत्मसात करण्याची गरज आहे. आता ‘एनडीए’च्या अभ्यासक्रमातूनही ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी अकादमीत ड्रोन, सिम्युलेटर आणि आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे,’ असेही द्विवेदी यांनी सांगितले.

‘थिएटरायझेशन’ म्हणजे काय ?

लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन्ही दलांच्या समन्वयासाठी एकात्मिक युद्ध विभाग म्हणजेच थेअटर कमांड स्थापन करण्यात येणार आहेत. या विभागात तीन्ही सैन्य दलांची शस्त्रे, मनुष्यबळ आणि पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळण, देखभाल-दुरुस्तीची संयुक्त व्यवस्था करण्याची रचना प्रस्तावित आहे. अशा प्रत्येक विभागावर विशिष्ट भौगोलिक प्रदेशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.