scorecardresearch

पुणे : नृत्याच्या क्षेत्रातील कामाचे लेखनाद्वारे दस्तऐवजीकरण; डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांचे अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण

केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत.

पुणे : नृत्याच्या क्षेत्रातील कामाचे लेखनाद्वारे दस्तऐवजीकरण; डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांचे अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण

भरतनाट्यम् नृत्यशैलीमध्ये तंजावर येथील मराठी राजांच्या योगदानाविषयीचा अभ्यास करताना असलेला दृष्टिकोन, भाषेच्या अडचणीमुळे या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत ही उणीव दूर करण्याच्या उद्देशातून जन्म झालेली ‘नृत्यगंगा’ आणि नाट्यसंगीतावर केलेला भरतनाट्यम् नृत्याविष्कार अशा नृत्याच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे व्हिडिओ चित्रीकरण आणि लेखनाद्वारे दस्तऐवजीकरण करण्याचा मनोदय ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी सोमवारी व्यक्त केला.

वयाच्या १५ व्या वर्षी अरंगेत्रम् केलेल्या आणि ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून भरतनाट्यम् नृत्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या डॉ. सुचेता भिडे-चापेकर मंगळवारी (६ डिसेंबर) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त बोलताना त्यांनी दस्तऐवजीकरण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : नवले पुलावरील अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर आज बैठक

वयाची पंचाहत्तरी सुरू होत आहे. शारीरिक हालचाली गतीने होत नाहीत. पण, अजूनही रंगमंचावरून कला प्रस्तुतीकरण करताना वयाचा विसर पडतो आणि कलेचा आनंद लुटते. हा आनंद रसिकांनाही मिळावा यासाठीच माझा प्रयत्न असतो, असे चापेकर यांनी सांगितले. गुरू पार्वतीकुमार यांच्या भरतनाट्यम् नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासात मी त्यांची सहायक होते. मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून पदवी संपादन करत असतानाच देशभर विविध ठिकाणी माझे नृत्याचे कार्यक्रम होत होते. मद्रास म्युझिक अकादमी येथील त्यांच्या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली. त्यानंतर मला गुरू के. पी. किट्टप्पा यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यातील प्राचीन रचना आणि कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन मिळाले.

केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत. त्यातूनच मग ’नृत्यगंगा’ या अनुपम नृत्यशैलीचा जन्म झाला. १९८२ साली याचा पहिला प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परर्फॉमिंग आर्ट्स येथे झाला होता. भरतनाट्यमचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्तानी संगीतात सादर केलेल्या हिंदी मराठी रचनांच्या या प्रयोगाला समीक्षकांसह रसिकांची भरघोस दाद मिळाली. या अभिनव प्रयोगासाठी त्यांनी तंजावूरच्या मराठी राजांच्या रचनांचा सखोल अभ्यास करून पीएच.डी. संपादन केली. शहाजीराजे, सरफोजीराजे यांच्या अनेक मराठी, हिंदी आणि संस्कृत रचनांच्या सादरीकरणातून भर घालून तीस वर्षाहून अधिक काळ नृत्यगंगा प्रवाही ठेवली असून त्यामध्ये शंभराहून अधिक रचना सादर केल्या जातात, असे त्यांनी सांगितले.

कलांमध्ये नाटक आणि शास्त्रीय संगीत याच्यानंतर नृत्य तिसऱ्या पायरीवर आहे. आता संगीत महोत्सवांमधून नृत्याच्या कार्यक्रमाला स्वतंत्र जागा मिळत आहे. त्याचप्रमाणे नृत्याचे महोत्सव होत असून त्याला रसिकांची दाद मिळत आहे याचा आनंद वाटतो.

. सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यगुरू

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 09:46 IST

संबंधित बातम्या