‘भारतीय इंग्रजी कवितेला परंपरा, इतिहास आहे. या काव्यशाखेला भारतात रुजून आता सुमारे २०० वर्षे होत आहेत…’ येत्या शनिवारच्या (दि. २१) जागतिक कविता दिनानिमित्त सांगताहेत प्राचार्य डाॅ. शिरीष चिंधडे. त्यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला हा संवाद.

भारतीयांनी केलेल्या इंग्रजी काव्यरचना जागतिक स्तरावर कधी आणि कशा पोचल्या?

भारतीय इंग्रजी कवितेला परंपरा, इतिहास आहे. या काव्यशाखेला भारतात रुजून आता सुमारे २०० वर्षे होत आहेत. इंग्रजी साहित्य संपर्कात आल्यावर भारतीयांनी इंग्रजीत काव्यरचनेला सुरुवात केली. हेन्री देरोझिओ (१८०९-१८३१) हा बंगाली तरुण या कवितेचे उगमस्थान मानला जातो. बंगालमध्ये इंग्रजी भाषा लवकर रुजल्याने तिथे या कवितेचा उगम आणि विकास होणे स्वाभाविक आहे. योगी अरविंद, गुरुदेव टागोर, तरुलता दत्त आणि कुटुंबीय, सरोजिनी नायडू, हरींद्रनाथ चट्टोपाध्याय अशी ही मोठी साखळी आहे.

काव्यरचनेला जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे श्रेय खरे तर इंग्रजांनाच द्यायला हवे. टागोरांची ‘गीतांजली’ १९१० मध्ये मूळ ‘बांगला’त प्रसिद्ध झाली. स्वतः टागोरांनी आपल्या ५३ कवितांची इंग्रजीत भाषांतरे केली. इतरही ५० कविता त्यात समाविष्ट केल्या. असा १०३ कवितांचा अनुवाद लंडनच्या इंडिया सोसायटीने १९१२ मध्ये प्रसिद्ध केला. बहुतेक कवितांचा अंतःस्वर आदर्शवादी, आध्यात्मिक असल्याने इंग्रजी रसिकतेला तो अनोखा जाणवला आणि त्यामुळेच १९१३ मध्ये ‘गीतांजली’चा नोबेल पारितोषिक देऊन सन्मानही करण्यात आला.

या काव्यरचनांची वैशिष्ट्ये काय सांगता येतील?

अनेक कवितांतून मुंबईनगरी तिच्या बहुआयामी स्वरूपात प्रतिबिंबित झालेली आहे. तिच्याशी या कवींचे प्रेम-द्वेषात्मक नाते आहे. इंग्रजी आणि मराठीत लिहिणारे दिलीप चित्रे तेथील व्यामिश्र जीवनाचे चित्रण करतात. ते संत तुकारामांचे अभंग आणि ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव इंग्रजीत आणतात आणि वडिलांच्या लोकलच्या प्रवासाचाही उल्लेख करतात.

धार्मिक आणि न-धार्मिक अनुभूती हा अरुण कोलटकर यांच्या कवितेचा मोठा आयाम आहे. त्यांनीही संत तुकारामांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांच्या ‘जेजुरी’ या इंग्रजी कवितासंग्रहाला राष्ट्रसंघाचे काव्यपारितोषिक आणि त्याद्वारे जागतिक मान्यता मिळाली. त्यांचे ‘काळाघोडा पोएम्स’ म्हणजे मुंबईच्या निम्नस्तरीय जीवनाचे प्रत्ययकारी आणि चित्रमय दर्शन. कौटुंबिक घट्ट नातेसंबंध, मित्रपरिवार यांविषयी बहुसंख्य कवींनी अत्यंत वाचनीय कविता लिहिल्या आहेत. रामानुजन यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे शीर्षक ‘रिलेशन्स’ असेच आहे. त्यांच्या आईविषयीच्या कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहेत.

जागतिक स्तरावर साहित्यकृती नेण्यासाठी काय करायला हवे?

जागतिक स्तरावरही अनेक प्रकाशन संस्था इंग्रजी नियतकालिके आणि काव्यसंग्रह प्रकाशित करीत आहेत. बऱ्याच नवकवींचे शिक्षण इंग्लंड, अमेरिकेत झालेले असल्याने त्यांचे संबंध पाश्चात्त्य विश्वाशी जुळल्याने प्रकाशन आता सोपे झाले आहे. भाषांतरांना बुकर वगैरेसारख्या जगन्मान्य संस्था आता मानाचे स्थान देऊ लागल्याने प्रोत्साहन मिळत आहे. साहित्य अकादमीही याबाबत मोठे कार्य करीत आहे. भाषांतर शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या संस्थाही निर्माण होत आहेत.

शाळा-महाविद्यालयांनी भाषांतर स्पर्धा, वर्ग घेतले पाहिजेत. मूळ भाषा व इंग्रजी उत्तम रीतीने जाणणारे भाषांतरकार उपलब्ध होणे आवश्यक आहे. कृत्रिम प्रज्ञेचे भाषांतर हा एक वाढता पर्याय आहे; परंतु शास्त्रीय, व्यावहारिक मजकुरासाठी तो योग्य आहे का, हा विचारही आवश्यक आहे. साहित्याचे भाषा सौंदर्य नैतिकता, अध्यात्म, भावनात्मक अमूर्त चिंतन यांतून प्रकटते. ‘एआय’च्या यांत्रिक, शुष्क, निष्प्राण, कुरूप भाषेला ते पेलवणारे नाही.

इंग्रजीमध्ये भाषांतर स्वरूपात काव्यरचना अधिक झाल्या, की थेट इंग्रजीमध्ये?

मूळ इंग्रजीत आणि भाषांतर स्वरूपात अशा दोन्ही रीतींनी रचना झाल्या व होत आहेत. परंतु कवितेच्या भाषांतरात मुळातील काव्य बरेचदा हरवून जाते, अशी तक्रार असते. अनेक बड्या मंडळींनी असे प्रयत्न केले आहेत; परंतु त्या मानाने फारसे यश नाही. याला दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांचे सन्माननीय अपवाद. थेट इंग्रजीत झालेल्या रचनांना जेवढे यश आणि मान्यता मिळालेली दिसते, तेवढी भाषांतरांना दिसत नाही.

काव्यरचनांमध्ये विषय वैविध्य जाणवते का?

नक्कीच! विषयवैविध्य बरेच आहे. मुख्य म्हणजे आजच्या अनेक तरुण कवींना आपली मूळ संस्कृती, वारसाप्राप्त संस्कार, परंपरा, पाळेमुळे यांचा आत्मशोध, नातेसंबंध हेही विषय आकर्षित करताना दिसतात. अर्थात परिसर, भोवताल यांचे भान त्यांना आहे. राजकारण, भ्रष्टाचार, बकाल होत जाणारे महानगरी जीवन, पर्यावरणीय ऱ्हास हेही विषय आहेत. अरुंधती सुब्रमण्यम, जीत थायिल, जेरी पिंटो, रणजित होस्कोटे आदी आजची काही प्रतिभावान नावे आहेत.

shriram.oak@expressindia.com