scorecardresearch

भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेत ; यंदा पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग

पुणे : यंदा पहिल्यांदाच भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला आहे.

mango
( प्रतिनिधिक छायाचित्र )

पुणे : यंदा पहिल्यांदाच भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला आहे. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून समुद्रमार्गे जहाजातून ५ जून रोजी मूंबई येथून पाठविलेला आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत २ जुलैपासून विक्रीसाठी दाखल झाला आहे. आजवर केवळ हवाईमार्गे भारतीय आंबे अमेरिकेत जात होते. यंदा प्रथमच समुद्रमार्गे आंबे पाठिवले होते. २५ दिवसांचा प्रवास करून हे आंबे चांगल्या स्थितीत अमेरिकेत पोहोचले आहेत.

भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (अपेडा) आणि मे. सानप अ‍ॅग्रो अ‍ॅनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नाने यंदा प्रथमच अमेरिकेस समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्यात आला होता. ५ जून रोजी मुंबईतून पाठविलेला आंब्याचा कंटेनर ३० जून रोजी अमेरिकेतील नेवार्क बंदरात दाखल झाला. हा कंटेनर १ जुलै रोजी आयातदार मे. अनुसया फ्रेश प्रा.लि. यांनी ताब्यात घेऊन उघडल्यानंतर कंटेनरमधील आंबा सुस्थितीत पोहचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील हंगामापासून भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे झाल्यास आंबा उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि आयातदारांना फायदा होणार आहे.

भारतातून सन २०२२ मध्ये अमेरिकेस सुमारे ११०० टन आंबा निर्यात झाला आहे. अमेरिकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या शंभर टक्के हवाईमार्गे होत आहे. त्यामुळे निर्यातदारांना प्रति किलो सुमारे ५५० रुपये विमानभाडे द्यावे लागते. त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना भारतीय आंबा महाग पडत होता. परिणामी निर्यातीवर मर्यादा येत होत्या. त्यावर उपाय म्हणून यंदा समुद्रमार्गे आंबे निर्यातीचा प्रयोग करण्यात आला होता. त्याद्वारे एकूण १६.५६० किलो आंबे सुरक्षितपणे अमेरिकेत पोहोचले.

समुद्रमार्गे वाहतूक फायदेशीर

आंबा समुद्रमार्गे निर्यात सुरू झाल्यास अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते. आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. सद्या आंब्याचे विमान भाडे सुमारे ५५० रुपये प्रती किलो असून, तीन किलोच्या बॉक्सकरिता सुमारे २० ते २२ डॉलर विमान भाडे आकारले जाते. समुद्र मार्गे निर्यातीने वाहतूक खर्चात मोठय़ा प्रमाणात कपात होऊन सदर खर्च १ डॉलर प्रती किलोपर्यंत खाली येऊन निर्यातीस मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने इतर देशांच्या आंब्यांची स्पर्धा करू शकेल.

समुद्रमार्गे वाहतूक खर्चात मोठय़ा प्रमाणात कपात होते. त्यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत इतर देशांच्या आंब्याच्या स्पर्धेत भारतीय आंबे टिकू शकतील. शिवाय अमेरिकेच्या बाजारात भारतीय आंबे जास्त दिवस राहतील. जहाजाद्वारे केशर आंबे पाठविले होते. हाच प्रयोग हापूसबाबतही करता येईल. समुद्रमार्गे निर्यात वाढविण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरची मदत घेण्यात येईल. वाहतुकीचा कालावधी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेत समन्वय साधला जात आहे. समुद्रमार्गे होणारी आंबा वाहतूक शेतकरी, निर्यातदार, आयातदार आणि अमेरिकेचा ग्राहक, अशा सर्वाच्या दृष्टीने फायद्याची होणार आहे.- सुनील पवार, कार्यकारी संचालक. पणन मंडळ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian mangoes sea america agricultural marketing board amy