जगात भारतीय लोकांना त्यांच्या कर्तृत्त्वामुळे नव्हे तर देशामुळे सन्मान मिळतो, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते गुरूवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील पुसाळकर अणुवैद्यक आणि क्ष किरण केंद्राचे उदघाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले.यावेळी पं. हदयनाथ मंगेशकर, वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, विजय पुसाळकर, तनुजा पुसाळकर आदी उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, आपल्याकडे चिकित्सेबाबत वेगवेगळ्या पॅथीच्या तटबंदी आहेत. मात्र, प्रत्येक चिकित्सापद्धतीत शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे समन्वित चिकित्सापद्धती निर्माण व्हावी. वैद्यकीय क्षेत्र हा व्यापार नसून ती सेवा असून त्याची समाजाला आवश्यकता आहे. माणूस आणि पशू यांच्यात फरक आहे. माणसाप्रमाणे पशुही विचार करतो. मात्र, माणूस विचार करतो आणि त्याच्यात संवेदना उपजत असते. माणसाने त्या संवेदना जागृत ठेवून परोपकारी वृत्तीने कार्य करावे, असे भागवत यांनी सांगितले.