पुणे : भारतीय रेल्वे कमी वेळेत जलद आणि अधिक मालवाहतूक करण्याचे नवनवीन उच्चांक गाठत आहे. गेल्या संपूर्ण वर्ष रेल्वेने जेवढी मालवाहतूक केली होती, त्यापेक्षा अधिक एक हजार २० दशलक्ष टन मालहावतूक चालू वर्षातील दहा महिन्यात (ऑक्टोबर अखेर) पूर्ण केली आहे. यातील एक अब्ज टनाचा पल्ला अवघ्या आठ महिन्यात पार केले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

देशात औद्योगिक, गृहनिर्माण क्षेत्रात झपाट्याने होणारा विकास यामुळे केंद्राने ‘बल्क सिमेंट टर्मिनल धोरण’ आणि कंटेनरमधून सिमेंट वाहतुकीसाठी सुसंगत दर जाहीर केल्याचा मोठा परिणाम झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी प्रमाणे, सर्वाधिक ५०५ दशलक्ष टन कोळश्याची मालवाहतूक झाली आहे. त्यापाठोपाठ ११५ दशलक्ष टन लोखंड, ९२ दशलक्ष टन सिंमेंट ही आकडेवारी विकासाच्या केद्राचे प्रतिबिंब मागणीतून दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय रेल्वेने सागरी बंदरे, प्रमुख महामार्गांशी रेल्वे जोडली आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य, उत्तर, दक्षिण भागातील रेल्वेने प्रवाशांना सुलभ सेवा देण्याबरोबरच मालवाहतुकीलाही तितकेच प्राधान्य दिले आहे. रस्त्यावरून होणारी वाहतूक खर्चीक, धोकादायक आणि वेळखाऊ ठरते. त्यामुळे रेल्वेने सुरक्षित, वेगात आणि सुलभ वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.

यंदाच्या वर्षी रेल्वेतून दैनिक सरासरी वाहतूक ४.४ दशलक्ष टनांवर स्थिरावली असून, गेल्या वर्षीची ४.२ दशलक्ष टनांची सरासरी सहज ओलांडली आहे. उद्योग जगताला लागणारा कच्चा माल- तुकड्यातील मालांचा पुरवठा वेळेवर होत असल्याने उद्योगा्ंनाही भरारी प्राप्त होत आहे. तसेच रस्ते वाहतुकीला प्राधान्य न दिल्याने प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीकडे वाटचाल होत आहे, असे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

मालवाहातूक काॅरिडाॅरचा फायदा

केंद्राने ‘पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक काॅरिडाॅर’ कार्यान्वित झाल्याने तसेच नव्या ‘उच्चक्षमता व्हॅगन’चा समावेश आणि ‘डिजिटल ट्रॅकिंग यंत्रणा’ यांमुळे मालवाहतुकीतील कामगिरी सुलभ होऊन आणखी सुधारली आहे. येत्या महिनाभरात आणखी ५०० किलोमीटर कॉरिडॉर सुरू होणार असल्याने दैनिक सरासरी ५ दशलक्ष टनांवर उद्दिष्ठ गाठले जाईल, असा अंदाजही पत्रकात नमूद केला आहे.

मालवाहतुकीचा आढावा

  • एकूण मालवाहतूक – १,०२० दशलक्ष टन
  • दैनिक सरासरी – ४.४० दशलक्ष टन – गेल्या वर्षी ४.२० दशलक्ष टन
  • एप्रिल ते ऑक्टोबर : ९३५.१ दशलक्ष टन – गेल्या वर्षी ९०६.९ दशलक्ष टन

क्षेत्रनिहाय वाटा

  • कोळसा – ५०५ दशलक्ष टन
  • लोखंडी धातू – ११५ दशलक्ष टन
  • सिमेंट – ९२ दशलक्ष टन
  • कंटेनर – ५९ दशलक्ष टन
  • आयर्न व स्टील – ४७ दशलक्ष टन
  • खते – ४२ दशलक्ष टन
  • खनिज तेल – ३२ दशलक्ष टन
  • अन्नधान्य – ३० दशलक्ष टन
  • कच्चा माल – २० दशलक्ष टन
  • इतर वस्तू – ७४ दशलक्ष टन