Central Railway Tops Performance Index / पुणे : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) आक्टोबर महिन्यापर्यंत अवघ्या सात महिन्यात भंगार विक्रीतून २४३.०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त मिळवला आहे. यामध्ये केवळ ऑक्टोबर महिन्यातच ५१.८६ कोटी रुपयांची सर्वाधिक कमाई केली आहे. जे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अवघी २८.९३ कोटी रुपये होती, म्हणजे यंदा तब्बल ७९ टक्के वाढ नोंदवली गेली.
भारतीय रेल्वेने ‘झीरो स्क्रॅप मिशन’ धोरणांतर्गत ‘विल्हेवाट, स्वच्छता आणि महसूल’ अशी ‘त्रिसूत्री’ अवलंबली आहे. याचा फायदा मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात होत आहे. मध्य रेल्वे अंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ असे पाच विभागांचा समावेश होतो. यापैकी अनेक मार्गांवरील स्थानकांचे- मार्गिकांचे विस्तारीकरण सुरू आहे. तसेच जुन्या प्रवासी डब्यांची दुरुस्ती, डागडुजी, वंदे भारत सारख्या डब्यांची (कोच) निर्मिती, अमृत भारत योजनेंतर्गत स्थानकांचा कायापालट करण्यात येत आहे.
यातून नादूरूस्त, जुने, खराब असे भंगारतील साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. यामध्ये छोट्या मोठ्या ४७० स्थानकांचा समावेश होतो. त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणी डेपो, वर्कशॉपही आहेत. रेल्वे मध्ये लोखंडी साहित्य विशेषतः रेल्वे रूळ, तुकडे, तांबे, ॲल्युमिनियम, जस्त असलेल्या वायर, विद्यूत यंत्रणेतील जुने रोहित्र, जुने लोकोमोटिव्ह, इंजिन, मालवाहू डबे यांचे वेळोवेळी नुतनीकरण सुरू असल्याने जुन्या भंगारातील वस्तूंचे, साहित्याचे प्रमाण मोठे आहे.
बाजारभावापेक्षा रेल्वेच्या लोखंडी वस्तुंना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या भंगारातील मोडक्या तोडक्या साहित्याती खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे सातत्याने भंगारातील वस्तूंची वेळोवेळी लिलाव पद्धतीने विक्री करत असते. भंगार वेळेवर विकल्याने रेल्वेच्या जागेचा सदुपयोग होतो, पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो आणि अर्थकारणालाही बळ मिळते, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कामगिरीतही मध्य रेल्वे अव्वल
भारतीय रेल्वेच्या संपूर्ण विभागांतर्गत मध्य रेल्वे विभागाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. केवळ भंगार विक्रीतच नाही, तर सुरक्षा सुधारणा, कार्यक्षमता, नवकल्पना, महसूल उत्पन्न, प्रकल्प पूर्णता, देखभाल दुरूस्तीसह एकूण २२ कामगिरी निर्देशांकांपैकी १० निर्देशांकावर उत्तम कामगिरी करून देशात प्रथमक क्रमांक मिळवला असल्याचेही रेल्वे प्रशासनाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘भंगार विक्री हा केवळ कमाईचा स्रोत नसून, कार्यक्षमता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना उत्तम आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.’ – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
