पुणे : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या मध्य, पूर्व, दक्षिण आणि उत्तर, पूर्व रेल्वे विभागातून अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली. दरम्यान, पुणे नाशिक द्रूतगती रेल्वे मार्ग अद्याप पूर्ण नसला, तरी साईनगर शिर्डी प्रस्तावित मार्ग पूर्ण करून शिर्डीमार्गे नाशिकला जाण्यासाठीचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या.

नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत माहिती देण्यासाठी वैष्णव यांनी दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र रेल्वेसाठी सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई ते पुणे अंतर अवघ्या ४८ मिनिटांमध्ये आणि पुणे ते हैद्राबाद अंतर अवघ्या एक तास ५५ मिनिटांमध्ये पार करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला.

दरम्यान, येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नाशिक येथील सर्वात मोठा सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातला असल्याने उत्तर प्रदेश येथील ‘महाकुंभ’साठी ज्याप्रमाणे देशभरातील प्रत्येक रेल्वेच्या विभागातून अतिरिक्त रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यानुसारच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार हरिद्वार आणि उज्जैन येथील कुंभमेळ्याबाबतही अशाच अतिरिक्त रेल्वे धावणार असल्याचे नियोजन आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

पुणे ते नाशिक द्रूतगती रेल्वे मार्गाबाबत अर्थसंकल्पात कुठलीच तरतूद करण्यात आली नसल्याने या मार्गाबाबत कुठलचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या मार्गाचे काम अडकले असले, तरी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणतांबा ते साईनगर शिर्डी या १७ किलोमीटर मार्गाला २४० कोटी रुपयांची मंजूरी यापूर्वीच देण्यात आली असून त्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त रेल्वेबरबर साईनगर शिर्डी या मार्गापर्यंत जादा रेल्वे सोडण्याचे नियोजन पुणे रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यातून येणाऱ्या रेल्वे जादा करून शिर्डी आणि तेथून पुढे सोडण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागाचे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई-पुणे-हैद्राबाद या हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडून आदेश येताच प्राथमिकतेनुसार तातडीने कामाला सुरूवात करण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी मार्गापर्यंत अतिरिक्त रेल्वे सेवा देण्याचे नियोजन सुरू आहे.- राजेश कुमार वर्मा, व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग