पुणे : बल्गेरियातील ब्लागोएव्हग्राड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. भारतीय संघात आयआयटी मुंबईतील तीन विद्यार्थी, कोलकात्यातील इंडियन संख्याशास्त्र संस्थेतील एक विद्यार्थी अशा एकूण चार विद्यार्थ्यांचा समावेश हो
भास्कराचार्य प्रतिष्ठानाने याबाबतची माहिती दिली. अमेरिकन युनिव्हर्सिटी इन बल्गेरिया यांच्या यजमानपदाखाली आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्यातर्फे २७ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील ८० विद्यापीठीय संघांतील ४४७ पदवी स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात भारतीय संघातील आयआयटी मुंबईतील भव्य तिवारी याने ७९ गुणांसह ग्रँड फर्स्ट प्राइज, पार्थ वर्तकने ५७ गुण, नीरव भट्टडने ५५ गुणांसह सेकंड प्राइज, तर कोलकात्याच्या भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील शौनक कार याने ६५ गुणांसह फर्स्ट प्राइज प्राप्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील डॉ. विनयकुमार आचार्य, अहमदाबादच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातील डॉ. उदयन प्रजापती यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. या विद्यार्थ्यांना प्रख्यात गणितज्ञांकडून ऑनलाइन, तसेच प्रत्यक्ष वर्गांद्वारे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक तयारी करता आली. भारतीय संघाने दुसऱ्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे.
भारतीय संघातील विद्यार्थ्यांची निवड पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानातर्फे आयोजित माधव गणित स्पर्धेद्वारे करण्यात आली. २०२६ च्या स्पर्धेत देशभरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. विनायक सोलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली २००९-१०मध्ये माधव गणित स्पर्धा सुरू करण्यात आली. आता ही स्पर्धा देशातील पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांमधील गणितीय प्रतिभा शोधण्यासाठी, विकसित करण्यासाठीचे व्यासपीठ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेतील भारतीय संघाचा सहभाग डॉ. दीपेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय उच्च गणित मंडळ या केंद्र सरकारच्या संस्थेने केलेल्या आर्थिक साहाय्यामुळे शक्य झाला.
भारतीय संघाचे यश भास्कराचार्य प्रतिष्ठान, तसेच भारतातील पदवीपूर्व गणित शिक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गणितातील उत्कृष्टतेचा प्रसार करण्याच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असल्याचे या कामगिरीने सिद्ध केले, असे संस्थेने नमूद केले.
