scorecardresearch

भारतीयांची दूध, मांस आणि मत्स्याहाराला पसंती

प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थाच्या आहारातील समावेशाचे प्रमाण १९९० ते २०१८ या काळात दुपटीने वाढल्याचे निरीक्षण द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ या नियतकालिकाने नोंदवले आहे.

लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थचे निरीक्षण

पुणे : प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थाच्या आहारातील समावेशाचे प्रमाण १९९० ते २०१८ या काळात दुपटीने वाढल्याचे निरीक्षण द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ या नियतकालिकाने नोंदवले आहे. जगभरातील नागरिकांच्या आहारात दूध, चीझ, अंडी, प्रक्रिया केलेले मांस आणि मासे यांचा समावेश वाढला असून भारतीयांची पसंती अंडी, दूध, मांस आणि मासे या पदार्थाना आहे.

द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ या नियतकालिकाने नुकतेच जागतिक स्तरावरील बदललेल्या आहार सवयींचा आढावा घेणारे हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. १९९०-२०१८ या काळातील जागतिक, सामाजिक आणि स्थानिक आहार सवयींतील प्राणीज उत्पादनांचे प्रमाण या संशोधनातून आहारातील दुधाचे प्रमाण ९६ टक्के, चीझचे प्रमाण ५६ टक्के तर अंडय़ांचे प्रमाण सुमारे १४१ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. भारतीयांकडून मात्र दूध, प्रक्रिया केलेले मांस आणि माशांना आहारात पसंती देण्यात येत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. काळाबरोबर वाढत चाललेले आर्थिक स्थैर्य, पदार्थाची सहज उपलब्धता, प्राणी पालनाच्या व्यवसायाकडे वाढता कल आणि प्रक्रिया उद्योगांचे वाढते जाळे यांमुळे मागील काही वर्षांत हा फरक पडल्याचे लॅन्सेटने नमूद केले आहे. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान या देशांतील सुमारे सहा लाखांहून अधिक नागरिकांच्या आहार विषयक सवयी या संशोधनात नोंदवण्यात आल्या आहेत. या माहितीचा उपयोग जागतिक आहार नोंदी अद्ययावतीकरणासाठी करण्यात येणार आहे. आहारातील दूध, दुग्धजन्य आणि इतर प्राणीज पदार्थाच्या वापराचा काहीसा दुष्परिणाम मानवाच्या प्रकृतीवर झाल्याचे निरीक्षण या पार्श्वभूमीवर आहार तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. पदार्थाची उपलब्धता आणि ते परवडण्यायोग्य आर्थिक सुबत्ता या दोन्ही गोष्टी नसताना आहारात या पदार्थाचा वापर मर्यादित होता. काळाबरोबर विविध प्रकारचे डाएट्स, जिम आणि व्यायामांचे प्रकार यांमुळेही आहारात प्राणीज पदार्थाचा अतिरेक वाढत आहे. त्याचे शरीराला फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस यांचा मर्यादित समावेशच अधिक योग्य असल्याचे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

कोणत्याही आहाराचा अतिरेक नको

आहार तज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, विविध प्रकारचे डाएट करण्याकडे सध्या नागरिकांचा कल आहे. त्यातून एकच एक गोष्ट अतिरिक्त खाण्याच्या सवयी वाढत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत महिन्यातून एकदा किंवा आठवडय़ातून एकदा या प्रमाणात मांसाहाराचे सेवन केले जात असे. आता डाएटच्या नावाखाली रोज मांसाहार केला जातो. चीझ, पनीर यांचे आहारातील प्रमाणही लक्षणीय आहे. अतिरिक्त प्रथिनांमुळेही कॅल्शियमचा ऱ्हास होतो. मूत्रिपडे आणि हृदयाचे विकार सुरू होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकाराच्या आहाराचा अतिरेक योग्य नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indians love milk meat fish observations lancet planetary health ysh

ताज्या बातम्या