पुणे : देशातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राविषयी प्रचंड उत्सुकता असून, भविष्यात या क्षेत्रात शिक्षण घेण्याकडे सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांचा कल आहे. मात्र, खगोलशास्त्र शिकण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीची कमतरता आणि मूलभूत संकल्पनांचे अपुरे आकलन ही मोठी अडचण आहे. खगोलशास्त्र शिक्षणाबाबत देशपातळीवर पहिल्यांदाच झालेल्या व्यापक सर्वेक्षणातून स्पष्ट झालेल्या या बाबी.

‘इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन’च्या ‘ऑफिस ऑफ ॲस्ट्रोनॉमी फॉर एज्युकेशन’च्या भारतातील केंद्रातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांचे मूलभूत खगोलशास्त्रीय ज्ञान, उपलब्ध शैक्षणिक साधने, खगोलशास्त्राशी असलेले सांस्कृतिक नाते आणि पुढील शिक्षणासाठी खगोलशास्त्र निवडण्याची त्यांची तयारी या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला.

‘ऑफिस ऑफ ॲस्ट्रोनॉमी फॉर एज्युकेशन’च्या भारतातील केंद्राचे व्यवस्थापक आणि सहसंशोधक प्रा. अनिकेत सुळे म्हणाले, ‘देशातील विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्राविषयीचे आकलन आणि दृष्टिकोन यांचे पहिल्यांदाच मूल्यमापन करण्यात आले. अभ्यासक्रम निर्मिती, शिक्षक प्रशिक्षणासह निरीक्षणांसाठी आवश्यक दुर्बिणी, तारांगणे अशा साधनांची उपलब्धता वाढवून खगोलशास्त्राचे शिक्षण बळकट करण्याची गरज आणि संधी असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.’

‘सर्वेक्षणातील माहितीच्या विश्लेषणातून पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याची आवश्यकता स्पष्ट झाली. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) नव्या पाठ्यपुस्तकांतील खगोलशास्त्रविषयक मजकुरासाठी या सर्वेक्षणातील निरीक्षणांचा फायदा झाला आहे,’ असे ‘आयुका’तील शास्त्रज्ञ आणि सर्वेक्षणातील सहसंशोधक प्रा. सुहृद मोरे म्हणाले. ते ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तक विकास समितीचेही सदस्य आहेत.

‘खगोलशास्त्राचे शिक्षण सर्वांसाठी अधिक सुलभ करण्याची, विद्यार्थ्यांचा उत्साह अधोरेखित करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे देशातील विज्ञान शिक्षणाला दिशा मिळेल,’ असा विश्वास होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. अर्नब भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.

असे झाले सर्वेक्षण

  • मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांचा सर्वेक्षणात सहभाग
  • देशभरातील १० राज्यांतील ३४ माध्यमिक शाळांमधील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची पाहणी.
  • इंग्रजीसह १० विविध भाषांत प्रश्नावली.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष

  • बहुसंख्य विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राविषयी रस असला, तरी आकाशीय वस्तूंचे आकार, अंतर आणि चंद्राच्या कला अशा मूलभूत संकल्पनांचे आकलन मर्यादित.
  • सुमारे एक-तृतीयांश विद्यार्थ्यांनाच खगोलीय अंतरांच्या मूलभूत मोजमापांची योग्य ओळख पटली.
  • तारे सौरमालेतील इतर वस्तूंपेक्षा खूप दूर असतात, याची जाणीव नाही.
  • केवळ ७ टक्के विद्यार्थ्यांना चंद्राच्या सर्व प्रमुख कला अचूक ओळखता आल्या.
  • दुर्बिणी (२६ टक्के) आणि तारांगण (२७ टक्के) अशा साधनांचा वापर मर्यादित.
  • सामाजिक-आर्थिक विषमतेचा शिक्षणातील कामगिरीवर लक्षणीय परिणाम. साधने उपलब्ध असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची माहितीआधारित प्रश्नांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी.
  • भारतीय संस्कृतीतील सण-परंपरांशी काही विशिष्ट चंद्रकलांचा संबंध असला, तरी त्यामागील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय आधाराविषयी अनेक विद्यार्थ्यांना माहितीचा अभाव.
  • अडचणी असूनही जवळपास ८६ टक्के विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र शिकण्यात आनंद. ७० टक्के विद्यार्थ्यांची भविष्यात या क्षेत्रात शिक्षण घेण्याची तयारी. मात्र, उच्च शिक्षणात खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक मार्गांविषयी पुरेशा माहितीचा अभाव.