मावळात इंद्रायणीचा दरवळ!

सुवासिक इंद्रायणी तांदळाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळात इंद्रायणीचा सुवास दरवळू लागला आहे.

तांदळाला पुणे, मुंबईत मागणी

पुणे : सुवासिक इंद्रायणी तांदळाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळात इंद्रायणीचा सुवास दरवळू लागला आहे. इंद्रायणी तांदळाचा हंगाम सुरू झाला असून मावळातील गावागावांतील कापणी अखेरच्या टप्प्यात आली आहे.

मावळात इंद्रायणी तांदळाची लागवड साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मावळात आंबेमोहोरची लागवड कमी झाली असून शेतकऱ्यांचा कल इंद्रायणी तांदळाच्या लागवडीकडे वाढला आहे. मावळातील पश्चिम भागातील तुंग, शिळीम, अजवली, जवण, मोरवे, येळसे, कोथुर्णी, वारू, लोहगड, घालेवाडी, महागाव, कडदे, करूंद, इंदोरी गावात इंद्रायणीची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. साधारणपणे १२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. जून महिन्यात इंद्रायणीच्या सुवासिक बियाणांची पेरणी केली जाते. पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने मावळातील शेतकरी लागवड करतात. चांगल्या प्रतीचे बियाणे तसेच सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यामुळे लागवडही उत्तम प्रकारे होती. ऑक्टोबर महिन्यात भात निवडला जातो. त्याला ‘खेड काढणी’ असे म्हटले जाते. इंद्रायणी भातात अन्य जातीचा भात आढळून आल्यास त्याला बाजूला काढले जाते, असे पवनानगरमधील शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले.

दिवाळीच्या आसपास कापणी सुरू केली जाते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कापणी केली जायची. आता यांत्रिक पद्धतीने कापणी तसेच झोडणी केली जात असून एकरी २० ते २५ पोती इंद्रायणी भाताचे उत्पादन निघते. एका पोत्यात ६० ते ७० किलो भात असतो. त्यानंतर व्यापारी तसेच शेतकरी भाताची खरेदी करतात. त्यावर मिलमध्ये प्रक्रिया करून इंद्रायणी तांदळाची विक्री केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मावळात १८ हजार हेक्टर खरीप क्षेत्र आहे. त्यापैकी साडेदहा ते ११ हजार हेक्टर क्षेत्रावर पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ भागातील शेतकरी इंद्रायणी तांदळाची लागवड करतात. ७५ टक्के क्षेत्रावर इंद्रायणीची लागवड करण्यात येते. इंद्रायणीचे हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते. मावळातील शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे इंद्रायणीची लागवड आणि उत्पादनात वाढ झाली आहे. 

संताजी जाधव, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वडगाव मावळ

सुवासिक इंद्रायणी तांदळाला पुणे, मुंबई, ठाणे, रायगड तसेच पिंपरी, चाकण परिसरातील ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. इंद्रायणी तांदळाची फारशी माहिती परराज्यात तसेच परदेशातही नाही. इंद्रायणी तांदळाचे विपणन (मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग) योग्य पद्धतीने केल्यास मावळातील इंद्रायणी तांदूळ देशभरातील वेगवेगळय़ा राज्यांत तसेच परदेशातही पोहोचेल.  – ज्ञानेश्वर ठाकर,इंद्रायणी तांदूळ उत्पादक शेतकरी, येळसे, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indrayani rice production ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या