पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून मावळ भाग, धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. त्यामुळे आळंदीतील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढीवारीसाठी उद्या मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांची जोरदार पावसामुळे तारांबळ उडाली आहे.

आळंदी इंद्रायणी नदी परिसरात पोलीस, नगरपरिषदेचे कर्मचारी असून इंद्रायणी नदी पात्राजवळ कोणीही येऊ नये असा सूचना दिल्या जात आहेत. दुतर्फा नदी घाट पाण्याखाली गेला असून शनिमंदिरा वरील भागात पाणी आली आहे. सिद्धबेट परिसरात पाणी आले आहे. माऊली बागपरिसरात पाणी आले असून गोशाळेतील गाई वासरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. आळंदीतील चारही पूल बंद करण्यात आली आहेत. तीन पुलावरून पाणी गेले असून चौथ्या पुलावरही पाणी चढण्यास सुरुवात झाली आहे. इंद्रायणी घाटावरील भाविकांसाठी असणारी चेंजिंग मंडप व्यवस्था वाहून गेली आहे. नदी काठ जवळील दुकानदार आपले साहित्य काढून घेत आहेत

इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. कृपया बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.