पिंपरी : आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (७ जुलै) तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी ( ८ जुलै) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी देहू आळंदीत येऊ नये, ज्या ठिकाणी आहात तेथेच सुरक्षित थांबावे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधून पालखीत सहभागी व्हावे, असे आवाहन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीने केले आहे.

दोन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि विशेषतः मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी भरून वाहत असून आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस पाहता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले आहे. तुकोबांच्या पालखीचे ७ जुलैला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. ८ जुलैला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. बुधवारी पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यात असणार आहे. यादिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.

वारकऱ्यांचे हाल

पालखी सोहळ्यासाठी देहू, आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांचे पावसामुळे हाल झाले. आळंदीतील भक्त निवास इमारत परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. सिद्धबेट भागातील ज्ञानेश्वरी मंदिर परिसर, इंद्रायणीनगरी, ठाकूरबुवा मंडप आणि गोपाळपुरा येथून भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

तुकोबांचे पालखी प्रस्थान दुपारी

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४१ वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात ७ जुलै पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात येतील. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.

आळंदीतील पूल बंद

इंद्रायणी नदीला पूर आला असून पुलावर आठ फूट पाणी आहे. आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नदीपात्रालगत थांबलेल्या ६०० वारकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. वारकऱ्यांनी आहेत तिथेच थांबावे. आळंदीत येण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करू नये. दिंडी प्रमुखांच्या संपर्कात आहोत, आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी सांगितले.

इंद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सुरक्षतेच्या दृष्टीने वारकऱ्यांनी देहूत येऊ नये. पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेच्या हद्दीतून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. प्रस्थान सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येईल, असे देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले.