पिंपरी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहूमधून वाहणारी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी भाग घेतला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. हा ५२६ कोटींचा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांसह आळंदीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना नदीत स्वच्छ पाणी मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला.

मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती तीर्थक्षेत्र देहूगाव, आळंदी मार्गे तुळापूर येथे जाऊन भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे मुळा-मुठा नदीला घेऊन उजनी धरणामार्गे पंढरपूरला जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील नदीचे पात्र १८.८० किलोमीटर आहे. नदी शहरात येताच अनेक गटारे, नाले नदीत थेट मिसळतात. त्यामुळे नदीचा रंग बदलू लागतो. त्याला नाल्याचे रूप येते. इंद्रायणीत जलपर्णी दिसते.

कुदळवाडी नाल्यातून औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे महापालिकेने हद्दीतील निघोजे ते चऱ्होली दरम्यान नदीसुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पाच्या ५२६ कोटी खर्चाच्या सविस्तर अहवालाला राज्य सरकारने २९ ऑगस्ट २०२५ मध्ये तांत्रिक मान्यता दिली. या कामाच्या निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी भाग घेतला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.

शुद्धीकरण प्रक्रिया

  • चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे ४० आणि डुडुळगाव येथे २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया.
  • नदीत मिसळणारे सांडपाणी ‘एसटीपी’कडे वळविणार.
  • ‘एसटीपी’त प्रक्रिया केल्यानंतरच सांडपाणी नदीत.
  • नदीकाठी देशी झाडे लावून हरित क्षेत्र निर्माण केले जाणार.
  • हिरवळ व शोभिवंत झाडे लावून उद्यान विकसन.
  • जॉगिंग ट्रॅक, पादचारी मार्ग तसेच विसर्जन घाटांचे विकसन.

असा आहे प्रकल्प

  • एकूण अंतर : १८.८० किलोमीटर
  • चिखली, डुडुळगावमध्ये ‘एसटीपी’
  • नदीकाठावर सुशोभीकरण, वृक्षारोपण, दाट वन क्षेत्र
  • एकूण खर्च : ५२६ कोटी रुपये
  • राज्य, केंद्राकडून प्राप्त होणारा निधी : २६३ कोटी रुपये
  • महापालिकेचा निधी : २६३ कोटी रुपये

इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समिती आणि आयुक्तांची मान्यता घेऊन प्रत्यक्ष काम महिनाभरात सुरू करण्याचे नियोजन आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.