scorecardresearch

पुणे: नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी इंद्रायणी स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी सेवा रस्ता; परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंद सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात दिली.

पुणे: नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी इंद्रायणी स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी सेवा रस्ता; परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
परिवहन मंत्री शंभूराज देसाई

नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंद सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात दिली. तसेच शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या शहरालगतच्या मार्गावर महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागांवर सेवा रस्ते तयार करण्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे: बाणेरमध्ये नियोजित गृहप्रकल्पात टाकीची भिंत कोसळून मजूर मृत्युमुखी; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा

आमदार भीमराव तापकीर यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्री देसाई यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘दरीपूल ते सिंहगड रस्त्यापर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता बांधण्यात आला आहे. उजव्या बाजूस सिंहगड रस्ता ते इंद्रयणी शाळेपर्यंत सेवा रस्ता असून नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या हद्दीत सेवा रस्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी नाल्याच्या बाजूने सुमारे तीन मीटर रुंदीची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) जागा आणि उर्वरित महानगर पालिकेच्या हद्दीतील नियोजित सहा मीटर रूंदीचा रस्ता असे दोन्ही मिळून एक मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम महापालिकेमार्फत करण्याचे नियोजित केले आहे. या कामासाठी पथ विभागामार्फत चार कोटी १८ लाखांची निविदा मागविण्यात आली असून ती मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. या मान्यतेनंतर महामार्गालगत इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापुढील नऱ्हे स्मशानभूमी ते भूमकर चौक व नवले पुल ते कात्रज दरम्यानच्या भागातील सेवा रस्ते एनएचएआयकडून करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा >>>पुणे: सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; अडीच लाखांचा ऐवज जप्त

महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ६० मीटर रुंदीचा राष्ट्रीय महामार्ग सोडून त्यालगत मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते वारजे ते वडगाव बुद्रुक ते आंबेगाव या भागापर्यंत दर्शविण्यात आले आहेत. महापालिकेच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग लगतचे १२ मीटर रूंदीचे डी. पी. रस्ते संपूर्णतः विकसित झालेले नाहीत. तथापि, वारजे भागामध्ये ज्या ठिकाणी चटई क्षेत्र मोबदल्यामध्ये रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे, त्या ठिकाणी १२ मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गा लगतचे सुमारे साडेतीन कि.मी. लांबीच्या डी. पी. रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडगाव बुद्रुकमध्ये एक कि.मी. लांबीचे १२ मीटर रूंदीच्या डी. पी. रस्त्याचे काम करण्यात आले आहे. आंबेगाव बुद्रुक या भागामध्ये १२ मीटर डी.पी. रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात आली नसल्याने तेथे रस्ता विकसनाचे काम अद्याप झालेले नाही. मात्र या भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या ६० मीटर रूंदी अंतर्गत स्वंतत्र सेवा रस्त्याचे काम एनएचएआयकडून सुरू आहे, असेही परिवहन मंत्री देसाई यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 17:32 IST

संबंधित बातम्या