पुणे : राज्यात अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) द्रवरूप पेट्रोलिअम वायूचा (एलपीजी) वापर केला जातो. धातू प्रक्रिया, फोर्जिंग, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग व कागद, सिरॅमिक व काच, रसायने आणि सरफेस कोटिंग या क्षेत्रातील उद्योगांकडून हा वापर होतो. सध्या औद्योगिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने या उद्योगांसमोर संकट निर्माण झाले आहे. अनेक उद्योगांनी उत्पादन क्षमता निम्म्यावर आणली असून, २ ते ३ दिवसांत काम पूर्णपणे बंद करण्याची वेळ येणार असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.
औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या उद्योगांकडून पाइप्ड् नॅचरल गॅसचा (पीएनजी) वापर केला जातो. लघु व मध्यम उद्योगांकडून औद्योगिक वापराच्या एलपीजीचा वापर केला जातो. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये अशा ‘एमएसएमई’ची संख्या जास्त आहे. औद्योगिक वापराचा एलपीजी सिलिंडर ३५ किलोपासून ४२५ किलोपर्यंत असतो. उद्योगांकडून त्यांची उत्पादनक्षमता आणि गरजेनुसार सिलिंडर घेतला जातो. सध्या या सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादन सुरू ठेवण्यात उद्योगांसमोर अडचणी येऊ लागल्या आहेत.
काम बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही
‘आमचा पॅकेजिंग साहित्य बनविण्याचा व्यवसाय आहे. एलपीजीचा वापर प्रामुख्याने उच्च तापमाननिर्मितीसाठी केला जातो. त्यात उत्पादने सुकविणे, उत्पादनांवर प्रक्रिया करणे यांचा समावेश आहे. आमच्याकडे सध्या १ ते २ दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक आहे. एलपीजीचा साठा कमी असताना उत्पादन सुरू ठेवल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आमच्याकडे सध्या ३५० कामगार काम करतात. एलपीजीचा पुरवठा न झाल्यास काम बंद ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही,’ असे चाकणमधील कन्व्हर्टर पॅकेजिंग सोल्युशन्स कंपनीचे अतिरिक्त संचालक शिवहरी हालन यांनी स्पष्ट केले.
उत्पादनक्षमता कमी
‘लघुउद्योगांकडून प्रामुख्याने एलपीजीचा वापर होतो. सध्या काहीही पूर्वसूचना न देता अचानक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक उद्योगांकडून उत्पादनक्षमता कमी करण्यात आली आहे. काही उद्योगांना आज भेटी दिल्या, त्या वेळी सगळीकडे हीच समस्या दिसून आली. पुढील २ ते ३ दिवसांत एलपीजी पुरवठा न झाल्यास उद्योग बंद ठेवावे लागतील, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.
कास्टिंग उद्योगात धातू वितळविण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. यासाठी इंधन स्रोत म्हणून एलपीजीचा वापर केला जातो. लघुउद्योगांकडे पीएनजी जोडणी नसते. त्यामुळे ते एलपीजी सिलिंडरवर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील ॲल्युमिनिअम कास्टिंग आणि डाय कास्टिंग क्षेत्रातील ५० टक्क्यांहून अधिक लघुउद्योग एलपीजीवर अवलंबून आहेत. यामुळे या उद्योगांचे उत्पादन ठप्प होऊन पुरवठा थांबला आहे. त्याचा परिणाम होऊन किमतीत वाढ होत आहे. – विधी दर्यानानी, सरचिटणीस, ॲल्युमिनिअम कास्टर्स असोसिएशन (ॲल्युकास्ट), इंडिया
एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात आल्याने लघुउद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीत लघुउद्योग महत्त्वाचे आहेत. लघुउद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण उद्योग क्षेत्रावर होतील. कारण याच लघुउद्योगांकडून पुरविण्यात येणाऱ्या सुट्या भागांच्या आधारे मोठ्या कंपन्या अंतिम उत्पादन बनवितात. सुट्या भागांचा पुरवठा थांबल्यास मोठ्या कंपन्यांनाही फटका बसेल. या परिस्थितीतून तातडीने मार्ग काढून लघुउद्योगांना दिलासा देणारी पावले सरकारने उचलावीत. – दिलीप बटवाल, मुख्याधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
