अन्न व औषध प्रशासनाकडून १५ बर्फ उत्पादकांना नोटिसा

उन्हाळा आणि थंड पेये हे लोकप्रिय समीकरण. परंतु रस्त्यावरील आणि रेस्टॉरंटस्मधीलही बर्फ घातलेली थंडपेये पिताना तो बर्फ खाण्यास योग्य आहे ना, याची विचारणा जरूर करा. पुणे विभागात काही शीतपेय विक्रेत्यांकडे अखाद्य स्वरूपाचा बर्फ येत असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासनास असून त्या अनुषंगाने झालेल्या तपासणीत पंधरा बर्फ  उत्पादकांना ‘स्टॉप अ‍ॅक्टिव्हिटी’ नोटिसा देण्यात आल्या आहेत.

एफडीएने बर्फाचे वीस नमुने घेऊन ५६८ किलो बर्फ दर्जाबद्दलच्या संशयावरून जप्त करून नष्ट केला आहे. ‘अखाद्य बर्फ नुसता डोळ्याने पाहून वेगळा ओळखू येत नाही. परंतु काही शीतपेय विक्रेत्यांकडे बर्फ खाण्यायोग्य दर्जाचा नसल्याची शक्यता आढळली. काही विक्रेत्यांकडे बर्फ विक्रीची बिले नव्हती. त्याआधारे केलेल्या तपासणीत बर्फ तयार करणाऱ्या १५ उत्पादकांना ‘स्टॉप अ‍ॅक्टिव्हिटी’ नोटिसा देण्यात आल्या,’ अशी माहिती अन्न विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. ते म्हणाले,‘‘काही ठिकाणी आम्हाला अस्वच्छताही आढळली. उत्पादक केवळ उद्योगांसाठी गोठवण्याच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अखाद्य बर्फाचे उत्पादन करत असले तरी अखाद्य बर्फ तुलनेने स्वस्त असल्याने काही ठिकाणी खाद्य-पेयांमध्ये वापरण्यासाठी त्याची विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उत्पादकांनी चांगल्याच पाण्यापासून बर्फ तयार करावा आणि एफडीएचा परवाना घ्यावा, अशा नोटिसा बर्फ उत्पादकांना दिल्या आहेत.’’

विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचा समावेश होतो. ‘एफडीए’च्या उन्हाळी मोहिमेत शीतपेये, ज्यूस, आइस्क्रीम, आइस कँडी अशा वेगवेगळ्या पदार्थाचे ३१ नमुने घेण्यात आले असून फळांचे रस विकणारी दुकाने, रसवंती गृहे यांच्या २३ तपासण्या करण्यात आल्या आहेत.  नमुन्यांचे विश्लेषण करून त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.