‘‘पुस्तकांच्या दुकानांत एका भारतीय स्थानिक भाषेतून दुसऱ्या भारतीय स्थानिक भाषेत भाषांतर झालेल्या पुस्तकांपेक्षा परदेशी भाषेतील किंवा इंग्रजीतील पुस्तके जास्त दिसतात. कारण आपल्याला आपल्या भाषा, संस्कृतीबद्दल न्यूनगंड वाटतो आणि हे आपले दुर्दैवच म्हणायला हवे,’’ असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ओरिया भाषेतील लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनी व्यक्त केले.
     डॉ. राय यांच्या ‘महामोह’ या मूळ उडिया कादंबरीचे राधा जोगळेकर यांनी केलेले मराठी भाषांतर पुरंदरे प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त डॉ. राय यांच्याशी ‘लोकसत्ता’ ने संवाद साधला.

    ‘‘भाषा ही प्रांताशी जोडलेली असते. मात्र, साहित्य हे स्वतंत्र आहे, ते कोणत्याही प्रांताशी किं वा भाषेशीही जोडलेले नसते. राजकारण, धर्म, भाषा भेदभाव पसरवतात. मात्र, साहित्य माणसाना जोडते. साहित्य हे संस्कृतीचे प्रलेखन असते. संस्कृती जतन करण्यासाठी विविध भाषांमध्ये साहित्य भाषांतरित होणे आवश्यक आहे; जेणेकरून भाषांमधील आपापसातील संवाद वाढीस लागेल,’’ असेही त्या म्हणाल्या.
  भारतीय स्थानिक भाषांतील पुस्तकांचे हिंदी किंवा इंग्रजीत होणारे भाषांतर या प्रवासाबद्दल डॉ. राय म्हणाल्या, ‘‘साहित्याची मूळ भाषा ते दुसरी भाषा असा थेट प्रवास होणे हे सर्वोत्तम असते. एखाद्या पुस्तकाचे भाषांतर होताना पुस्तकातील विचार, वातावरण, शैली याच्यात थोडा बदल होत असतो. मूळ भाषा, संस्कृती आणि भाषांतर होत असलेली भाषा आणि संस्कृती यांची थोडीफार सरमिसळ होत असते. वाचकाला ती साहित्यकृती आपलीशी वाटावी यासाठी ही सरमिसळ आवश्यकही असते. मात्र, त्यामुळे पुस्तकाच्या प्रवासात भाषांतराचे जेवढे टप्पे अधिक तेवढे त्यातील मूळ साहित्य थोडे कमी होतच असते. चांगल्या साहित्यकृतीच्या भाषांतरासाठी एका चांगल्या धोरणाची आवश्यकता आपल्याकडे आहे.’’
साहित्यातील सध्याच्या प्रवाहांबाबत डॉ. राय म्हणाल्या, ‘‘प्रत्येक वेळी जुने ते सोने, एवढेच खरे नाही. नवे लेखक, नवे विषय येत आहेत आणि त्याचे स्वागत केले पाहिजे. मात्र, त्याचवेळी आज लिहिले की उद्या लगेच प्रसिद्धी हवी, पुरस्कार हवेत अशीही काहीशी वृत्ती वाढू लागली आहे, ती धोकादायक आहे.’’
साहित्य ही काही उत्सव करण्याची गोष्ट नाही. मात्र तरीही साहित्य संमेलनेही साहित्याच्या प्रसारासाठी हातभार लावतात, हे नाकारता येणार नाही, असे सांगून डॉ. राय म्हणाल्या, ‘‘साहित्याच्या दृष्टीने खूप काही गंभीर चर्चा संमेलनांमध्ये होत नाहीत. तेवढी वेळही नसतो. मात्र, वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारे लेखक एकमेकांना भेटतात, वाचकांपर्यंतही थेट पोहोचतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.’’
माझी पुढील कादंबरी ही धर्म या संकल्पनेवर असणार आहे. गेली तीन वर्षे मी त्याबाबत विचार करते आहे. मी माझ्या लेखनातून माणसाचा, माणूसपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. समाजात घडणारे बदल, त्याचे माणसावरचे परिणाम, मानसिकता या सगळ्या गोष्टी माझ्या लेखनात मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी फक्त ओरिया भाषेसाठी किंवा ओरिसासाठी लिहिते असे म्हणता येणार नाही. मी सगळ्या भाषा, प्रांत, संस्कृती यांच्यासाठी लिहिते. सध्या देव ही संकल्पना, धर्म, धर्मामुळे होणारी दुफळी, धर्माचे माणसाच्या आयुष्यातील स्थान या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी माझ्या पुढील कादंबरीत करत आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे.
-डॉ. प्रतिभा रॉय