Santosh Pandit Bail: समाजमाध्यमात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरसेविकेविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पंडित यांनी, “माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, पण कोणाला चुकीचे वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो”, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, “मी माझा संवैधानिक अधिकार बजावत राहणार, थांबणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तो माझा संवैधानिक अधिकार – पंडित

अटकेनंतर पंडित यांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर पंडित कारागृहातून बाहेर आले व त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “जे काही झालं तो मोठा शॉकच होता. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे”, असे संतोष पंडित टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. “मी जे काही करतोय तो माझा संवैधानिक अधिकार आहे. मी माझा अधिकार बजावत असतो. पहिल्यांदाही तो बजावत होतो आणि यापुढेही बजावत राहणार”, असे पंडित यांनी स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत – पंडित

“जे काही करत होतो ते सुरु करताना मी कोणाला विचारले नाही, तो माझा संवैधानिक अधिकार आहे, तो बजावत आलो आणि यापुढेही बजावत राहणार, मी थांबणार नाही. लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्यांना निवडून देतो, जे लोक सत्तेत आहेत, मग तो कोणताही पक्ष असो. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. मी वैयक्तिक टीका कोणावर केलेली नाही”, असे पंडित पुढे बोलताना म्हणाले.

…तर माफी मागतो – पंडित

“माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, पण कोणाला चुकीचे वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश जनतेचे भले व्हावे एवढाच आहे. मी समाजाकार्य करत नाही, मी संवैधानिक अधिकार बजावतोय, तो मी बजावतच राहणार, थांबणार नाही”, असे संतोष पंडित यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंडित यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.