पुणे : ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डाॅ. अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर आणि सेवक अतुल घटकांबळे यांच्या संपर्कात होता. अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डाॅ. तावरे सामील असल्याचे पुरावे सरकार पक्षाकडे आहेत,’ अशी माहिती विशेष न्यायालयात देण्यात आली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात डाॅ. अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या अर्जास विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा डाॅ. तावरे याने न्यायालयात केला होता.
‘पोलिसांनी तावरेच्या मोबाइल क्रमांकाची तांत्रिक तपासणी केली, तेव्हा तो डाॅ. हाळनोर आणि घटकांबळे यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. मुलांच्या पालकांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने दबाव टाकला. या प्रकरणातील साक्षीदारांनी कबुलीजबाब नोंदविला आहे. डाॅ. तावरे या कटात सामील होता. त्याची भूमिका महत्त्वाची आहे,’ असा युक्तिवाद हिरे यांनी केला. डाॅ. तावरे याने दाखल केलेल्या अर्जावर १० जून रोजी सुनावणी होणार आहे. तावरे याचे वकील त्याची बाजू मांडणार आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. मोटारचालक मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत केले. ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळेमार्फत आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डाॅ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायदा, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.