अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ८९ संमेलनाध्यक्षांची माहिती, छायाचित्रे आणि त्यांचे साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांचा इतिहासच वाचकांसमोर उलगडला जाणार आहे.
साहित्य संमेलनामध्ये पुस्तक विक्रेत्यांकडून विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रांगणात कायमस्वरूपी पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘शब्दांगण’ या संस्थेचा साहित्य संमेलनामध्ये प्रथमच सहभाग असेल. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये असलेल्या शब्दांगणच्या दालनात साहित्याचे स्वतंत्र दालन मांडण्यात येणार आहे. या दालनामध्ये पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोिवद रानडे यांच्यापासून ते ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची उपलब्ध पुस्तके स्वतंत्ररीत्या मांडण्यात येणार आहेत. या दालनातील पुस्तके पाहून वाचकांच्या स्मृतींना नक्कीच उजाळा मिळेल. परंतु, या स्मृती वाचकांसोबत कायमस्वरूपी राहाव्यात या उद्देशातून शब्दांगणने ‘आपले ८९ संमेलनाध्यक्ष : संमेलनाची स्मरणयात्रा’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी यांनी संकलन केलेल्या या पुस्तकामध्ये आजवरच्या सर्व संमेलनाध्यक्षांची त्यांच्या छायाचित्रासह तसेच त्या संमेलनाबद्दल थोडक्यात माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या पुस्तकाचे संमेलनस्थळी प्रकाशन करण्यात येणार असून शब्दांगणच्या स्टॉलवर सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असेल, अशी माहिती शब्दांगणचे संचालक लक्ष्मण राठिवडेकर यांनी दिली.
शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे दर्शन
साहित्य संमेलनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेल्या व्यंगचित्रांचे दर्शन साहित्यप्रेमींना घडणार आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये ‘साहित्य दरबार’तर्फे भरविण्यात येणाऱ्या ‘कुंचल्याचे फटकारे’ या प्रदर्शनाचे शुक्रवारी (१५ जानेवारी) परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता उद्घाटन होणार आहे. शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत.