पुणे : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून पाठय़पुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठय़पुस्तके दिली जाणार आहेत. या पुस्तकाचे तीन किंवा चार भाग असतील. सत्रानुसार विद्यार्थ्यांनी तो भाग घेऊन जायचा असल्याने दप्तराचे ओझेही वाढणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर काही पाठय़पुस्तके तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली.

शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> ईडा पिडा टळून राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना

केसरकर म्हणाले, की शाळांमध्ये पुस्तके अनेक वर्षांपासून मोफत दिली जातात. पण अनेक मुलांकडे वह्या घेण्याइतकेही पैसे नसतात. काही संस्था वह्या वाटपाचा उपक्रम राबवतात. मात्र मुलांनी वह्या मिळण्यासाठी वाट पाहात राहायची का, हा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर वह्याही मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नावीन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यात अभ्यासक्रमाच्या धडय़ांबरोबर लेखनासाठीची कोरी पानेही समाविष्ट असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ती पुस्तके सोयीस्कर ठरतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यात शालेय स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, कला-क्रीडा आदींचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक भरतीसह प्राधान्याने शिक्षकांचे समायोजन

शिक्षकांची भरती झाली पाहिजे. ५० टक्के भरतीला मान्यता असल्याने ५० टक्के भरती होईल. पण किती शाळा आवश्यक आहेत, किती अनावश्यक आहेत, किती शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, त्यांचे समायोजन कसे करायचे याचाही विचार करणे आवश्यक आहे. तसेच अत्याधुनिक सुविधा असलेल्या शाळा निर्माण कराव्या लागतील. मुलांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. ग्रामीण भागातील मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. शिक्षकांची भरती करताना अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांनी गैरप्रकार करून उत्तीर्ण होणे यापेक्षा वाईट गोष्ट नाही.

टीईटी गैरप्रकाराबाबत केसरकर म्हणाले, की शिक्षकांनीच गैरप्रकार करून उत्तीर्ण होणे यापेक्षा वाईट गोष्ट नाही. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या प्रत्येक शिक्षकाला आपण काय केले हे माहीत होते. त्यामुळे त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. कारवाईविरोधात काही शिक्षक न्यायालयात गेले असले, तरी शासन आपली बाजू न्यायालयात मांडेल.