राज्यातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचीही चौकशी

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत संचालनालयाचा नवा गोंधळ दररोज उघड होत आहे. स्थानिक परंतु अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनीही दोन राज्यांत अर्ज केल्याच्या संशयावरुन संचालनालयाकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी खोटे रहिवासी दाखले दाखवून वैद्यकीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याचे समोर आल्यानंतर प्रवेश यादी जाहीर करण्याची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी संचालनालयाने पुढे ढकलली. त्याचबरोबर संशयास्पद कागदपत्रे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर त्यांच्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. गुणवत्ता यादीत अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर खुणा करण्यात आल्या. अशा ४४० विद्यार्थ्यांची पडताळणी संचालनालयाकडून करण्यात येत आहे. मात्र यामध्ये अनेक स्थानिक विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. अखिल भारतीय कोटय़ातून दुसऱ्या राज्यातील महाविद्यालयासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही आता संचालनालयाच्या पडताळणीची टांगती तलवार आहे. त्याचप्रमाणे राज्यातूनच दहावी झालेल्या काही विद्याथ्यार्ंची नावेही परराज्यातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी दोन राज्यांच्या कोटय़ात प्रवेशासाठी अर्ज केलेले, रहिवासी दाखल्याचा घोळ असलेले काही विद्यार्थी अद्यापही गुणवत्ता यादीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

चार महाविद्यालये अपात्र

भारतीय वैद्यकीय परिषदेने राज्यातील चार महाविद्यालयांना प्रवेशासाठी अपात्र घोषित केले आहे. परिषदेची राष्ट्रीय सल्लागार परिषदेची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये राज्यातील ६९ महाविद्यालयांना प्रवेशासाठी अपात्र ठरवण्यात आले. त्यातील चार महाविद्यालये राज्यातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतूनच प्रवेश घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने केले आहे.

विद्यार्थी तणावात

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचा जवळपास गेला आठवडाभर प्रवेशाचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे आता विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. रोज नवी येणारी सूचना, पडताळण्या यांमुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.