scorecardresearch

भाजपबरोबर युतीसाठी आग्रही पण..

विरोधी पक्षात किती काळ बसायचे असा प्रश्न उपस्थित करून आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी धरला आहे.

मनसे-भाजप युतीचा उद्या निर्णय

पुणे : विरोधी पक्षात किती काळ बसायचे असा प्रश्न उपस्थित करून आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विचार करता भाजपला टाळी देणे राजकीयदृष्टय़ा फायद्याचे होईल, असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी युतीबाबतचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. युतीबाबत तूर्त चर्चा नको, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही निर्णयाबाबत प्रतिक्षा असून युतीचा निर्णय मुंबईत बुधवारी (२ फेब्रुवारी) होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

महापालिका निवडणूक तीन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा आग्रह धरला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या वाटेवर घेऊन जायचे असेल, तर पुण्यात मनसेने भाजपशी युती करण्याची आवश्यकता आहे. युती केल्यास मनसेचे संख्याबळ वाढेल, भाजपलाही मनसेचा फायदा होईल आणि दोन्ही पक्ष सत्तेत येण्याची शक्यता अधिक राहिल, असे गणित पुण्यातील मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडले होते.

पुणे महापालिकेत सन २०१२ मध्ये मनसेचे २९ नगरसेवक होते. त्यानंतर २०१७ च्या भाजपच्या लाटेत सर्वाधिक फटका मनसेला बसला आणि त्यांचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. त्यातही १० हजारांपेक्षा अधिक मते केवळ शहराध्यक्ष वसंत मोरे यांना मिळाली होती. सन २०१२च्या महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मनसेची मतांची टक्केवारी घसरली आहे. मनसेच्या २०१२च्या महापालिकेतील निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी २७ नगरसेवकांनी पुन्हा २०१७मध्ये निवडणूक लढवली होती. त्यापैकी १९ जागांवर भाजपने मोठय़ा मताधिक्क्याने विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये युती झाली, तर जागावाटपाचे घोडे अडण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मनसे-भाजपमध्ये अधिकृत युतीपेक्षा मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही पुढे येऊ शकतो, अशी चर्चा मनसेमध्ये आहे.

भाजप पदाधिकारीही उत्सुक

मनसे बरोबर युती करण्यासाठी भाजपमधील काही पदाधिकारी उत्सुक असले तरी मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका लक्षात घेता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून युतीला हिरवा कंदील मिळण्याबाबत संदिग्धता आहे. मात्र पुण्यात मनसेशी युती करायची असेल, तर काय काय शक्यता असू शकतील, याची पडताळणी सुरू झाली आहे. मनसेकडून अधिकृतरित्या प्रस्ताव आल्यास भाजप काय भूमिका घेणार, याबाबतही अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

भाजप कार्यालयाला भेट

महापालिका भवनासमोर भारतीय जनता पक्षाने नवे कार्यालय घेतले आहे. या कार्यालयातून पक्षाचे कामकाज सुरू झाले आहे. या कार्यालयाला मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही काही दिवासांपूर्वी भेट दिली होती. या भेटीनंतरही भाजप-मनसे युतीबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. त्यातच निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे.  

युतीबाबत भाजप नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला नको असेल तर मनसेचीही एकला चलो हीच भूमिका असेल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबर बुधवारी मुंबईत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. या बैठकीत मनसेची आगामी निवडणुकीसाठी दिशा आणि रणनिती स्पष्ट होईल.

– वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Insisting alliance bjp decision mns bjp alliance tomorrow ysh

ताज्या बातम्या