पुढील पंधरा दिवसांत पथकाकडून अंतिम तपासणी, जानेवारीपासून प्रत्यक्ष सेवा शक्य

पुणे : वनाज ते रामवाडी या मार्गिकेअंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गावर आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेतील पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या सात किलोमीटर अंतराच्या मार्गाची अंतिम तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाकडून होणार आहे. त्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवडय़ात तपासणी करण्यासाठी महामेट्रोला वेळ दिली आहे. अंतिम तपासणीनंतर महामेट्रोकडून प्रवासी सेवा सुरू करण्याबाबत राज्य शासनाला कळविले जाणार आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता मेट्रोची प्रत्यक्ष सेवा जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिचंवड ते स्वारगेट अशा एकूण ३२ किलोमीटर अंतरावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. यापैकी वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर अंतरामध्ये आणि पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या सात किलोमटीर अंतरावरील प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजित होते. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनकडून तसे सातत्याने सांगण्यात आले होते. या दोन्ही मार्गावर मेट्रोची यशस्वी तांत्रिक चाचणीही महामेट्रोकडून घेण्यात आली होती. तसेच स्थानके, सरकते जिने, विद्युत व्यवस्थेची कामेही महामेट्रोकडून पूर्ण करण्यात आली आहेत.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाकडून प्राधान्यक्रमाच्या या दोन्ही मार्गिकांच्या कामांची अंतिम पाहणी होणार आहे. तांत्रिक तपासणीनंतर प्रवासी सेवा सुरू करण्याबाबत राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर अंतरावर जुलै महिन्यात चाचणी घेण्यात आली होती. तर जानेवारी २०२० मध्ये संत तुकारामनगर ते पिंपरी-चिंचवड महापालिका या अडीच किलोमटीर लांबीच्या अंतरावर चाचणी घेण्यात आली होती. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाकडून अंतिम प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राज्य शासनाला तसे कळविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

दिल्लीच्या धर्तीवर तिकिटदर

दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर पुणे मेट्रो मार्गिकेसाठी तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या एका किलोमीटरसाठी तिकिट दर दहा रुपये एवढा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवासाचे टप्पे आणि अंतर यानुसार तिकिट दर निश्चित होईल. तिकिट दराबाबतचा अंतिम निर्णय मेट्रो प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वी निश्चित होईल. मेट्रोमधून महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘नारीशक्ती’नावाचा स्वतंत्र डबा असेल. मेट्रो स्थानकावर आणि मेट्रो डब्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा आहे.