पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले येत्या सोमवारी (१९ मे) पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात येणार आहे. या दोन्ही पालख्या एक दिवस पुण्यात मुक्कामी असतात. लाखो वारकरी तसेच सर्वसामान्य नागरिक या सोहळ्यात सहभागी होतात. पालखी सोहळा ज्या मार्गावरून येणार आहे, त्याची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. भोसले करणार आहेत.
कळस येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. संगमवाडी, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, बोपोडी, जुना मुंबई पुणे रस्ता, शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लक्ष्मी रस्ता, भवानी पेठ व नाना पेठेतील पालखी विठोबा मंदिर या संपूर्ण मार्गाची पाहणी आयुक्त करणार आहेत. या पाहणी दौऱ्यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पथ, विद्युत विभाग, घनकचरा यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
रस्त्यांची सद्य:स्थिती, आवश्यक सोयीसुविधा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था याची पाहणी केली जाणार आहे, असे आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.