गळतीमुळे राज्यभर गाजलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामांची राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या (नॅशनल डॅम सेफ्टी ॲथॉरिटी – एनडीएसए) अधिकाऱ्यांनी पाहणी केली. धरणाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने केलेल्या कामाची सविस्तर माहिती घेऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी टेमघर धरण दुरुस्तीचे प्रारूप देशभरातील धरणांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले, असा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेमघर धरणाला सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सन २०१७ मध्ये जलसंपदा विभागाकडून धरण दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. ग्राऊटिंग आणि शॉर्टक्रीट कामामुळे गळतीच्या प्रमाणात ९० टक्के घट झाली आहे. राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाने १२ नोव्हेंबरला धरणाला भेट देऊन या कामांची पाहणी केली. प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. चंद्रशेखर अय्यर, सदस्य आनंद मोहन, रिचा मिश्रा, विवेक त्रिपाठी, अनिल जैन, एस. एस. बक्षी, मनोज कुमार आणि हरिष उंबरजे या वेळी उपस्थित होते. जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी प्राधिकरणाला टेमघर धरण दुरुस्तीच्या कामांची माहिती दिली.

हेही वाचा: श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड; पुणे महापालिकेडून कारवाई सुरू

याबाबत बोलताना अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले,की टेमघर धरणाची गळती रोखण्याची कामे करताना आलेल्या तांत्रिक, प्रशासकीय अडचणी याबाबत प्राधिकरणाने माहिती घेतली. विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट व इतर रसायनांचे मिश्रण धरणात निर्माण झालेल्या पोकळ्यांमध्ये सोडून त्याद्वारे धरणातील पोकळ्या भरून काढण्यात आल्या. या कामाला ‘ग्राऊटिंग’ असे म्हणतात. धरणाच्या पाण्याकडील बाजूस विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सिमेंट व इतर रसायनांच्या मिश्रणातून तयार केलेल्या कॉंक्रिटचा लेप देण्यासाठी मिक्स संकल्पन आणि कार्यपद्धती विकसित करण्यात आली. त्याला शॉर्टक्रीट या नावाने ओळखले जाते. शॉर्टक्रीटमुळे धरणातील पाणी पाझरून धरणात जाण्यास अटकाव होतो. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राऊटिंग, शॉर्टक्रीट आतापर्यंत कोणत्याही धरणात करण्यात आले नव्हते. त्यामुळे या तंत्रज्ञानाची कार्यपद्धत विकसित करून त्यानुसार सन २०१७ ते २०२० या दरम्यान टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामामुळे धरणातील गळतीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

हेही वाचा: पुणे: वाहतूककोंडी टाळण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून उपाययोजना करण्यात येणार

टेमघर धरण गळती प्रतिबंधक कामांचा अनुभव विचारात घेऊन देशातील इतर धरणांवर देखील ‘टेमघर धरण दुरुस्तीचे प्रारूप’ वापरता येईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला. प्राधिकरणाच्या माध्यमातून देशातील सर्व धरणांच्या गळती तसेच दुरुस्ती कामांमध्ये टेमघर प्रमाणे ग्राऊटिंग आणि शॉटक्रीट या कार्यपद्धतीची शिफारस करण्यात येणार आहे, असेही कोल्हे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of temghar dam repair work bydam safety authority pune print news tmb 01
First published on: 15-11-2022 at 10:30 IST