पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जमा करून ठेवण्याचे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेवेळी कागदपत्रांच्या अभावामुळे गोंधळ होऊ नये, यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांनी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबवली जाते. या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रावर केली जाते. ऐन वेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरुवात करण्याबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमातीव्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांना ‘नॉन क्रीमी लेअर’ सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सैन्यदलातील अथवा अल्पसंख्याक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चित केला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.